शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री यांच्या कुंडल्या बाहेर काढू - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कुडाळ - सिंधुदुर्ग विकासाच्या बढाया मारणाऱ्या शिवसेनेच्या खासदार, पालकमंत्री आणि आमदारांनी जिल्हा विकासाचा बट्टयाबोळ केला. त्यांच्या कुंडल्या बाहेर काढाव्या लागतील. पालकमंत्र्यांसारखे निष्क्रिय नेतृत्व आतापर्यंत मिळालेले नाही, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आडवे येथे पत्रकार परिषदेत केला.

कुडाळ - सिंधुदुर्ग विकासाच्या बढाया मारणाऱ्या शिवसेनेच्या खासदार, पालकमंत्री आणि आमदारांनी जिल्हा विकासाचा बट्टयाबोळ केला. त्यांच्या कुंडल्या बाहेर काढाव्या लागतील. पालकमंत्र्यांसारखे निष्क्रिय नेतृत्व आतापर्यंत मिळालेले नाही, असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आडवे येथे पत्रकार परिषदेत केला.

या वेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत समर्थ विकास पॅनेलला साथ देण्याचे आवाहन करत श्री. राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, आमदार गेली तीन वर्षे कार्यरत आहेत; पण एक टक्काही विकास करू शकलेले नाहीत. माझ्या कारकिर्दीत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला होता. अनेक विकासात्मक प्रकल्प आणले; पण सध्या रस्ते, विमानतळ, सी वर्ल्ड, आयटी पार्क, दोडामार्ग एमआयडीसी आदी सगळे प्रकल्प ठप्प आहेत. महामार्ग खड्डेमय झाला आहे. हे तिन्ही पदाधिकारी निष्क्रिय आहेत. त्यांनी फक्त जिल्ह्याच्या विकासाच्या बढाया मारण्याचे काम केले. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.’’

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात समर्थ विकास पॅनेलचे २९ सरपंच, तर ५५९ सदस्य बिनविरोध आले आहेत. विरोधकांचे आकडे दिशाभूल करणारे आहेत. ग्रामपंचायत हद्दीत घर बांधणी अधिकार पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतस्तरावर मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.’’
श्री. राणे म्हणाले, ‘‘खासदारांनी कोकणसाठी एकही विकासात्मक प्रकल्प आणला नाही. लोकसभेत ते बोलताना दिसत नाहीत. त्यांनी अनेक घोटाळे केले. त्यांची मागची कुंडली काढावी लागेल. त्यांच्या विरोधात १३ प्रकरणे माझ्या हातात आहेत. त्यामुळे त्यांनी पात्रता पाहून टीका करावी; अन्यथा नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा. जिल्ह्यात ज्यांना कोणी ओळखत नाहीत, ते आमच्यावर टीका करत आहेत, हे हास्यास्पद आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांचा स्मगलिंग इतिहास उघड करावा लागेल. त्यामुळे बदनामीकारक व खोटे आरोप निष्क्रिय पालकमंत्र्यांनी थांबवावेत. आपले अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न पालकमंत्री दीपक केसरकर करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय पालकमंत्री अशी ओळख केसरकर यांनी निर्माण केली. त्यांना पोलिस सलाम करत नाहीत, ते गृह राज्यमंत्री कसले? हवालदाराला राज्यात सन्मान; मात्र गृह राज्यमंत्र्यांना कोणी विचारत नाही. त्यांनी जिल्ह्याचे नाव राज्यात खराब केले.’’

ते म्हणाले, ‘‘शिवसेनेने मला अनेक पदे दिली, हे मी मान्य करतो. या पदांच्या मोबदल्यात पक्षासाठी योगदान, त्यात परिश्रम घेतले आहेत. हे तिन्ही नेते तिथपर्यंत जाऊही शकत नाहीत.’’ दत्ता सामंत, सतीश सावंत, रणजित देसाई, विनायक राणे, संध्या तेरसे, ओंकार तेली, सुनील बांदेकर, अनिल कुडपकर आदी उपस्थित होते.

पात्रता नसणाऱ्यांनी टीका करू नये
समाजात स्टेटस, पात्रता नसणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आमचा पक्ष महाराष्ट्र की कणकवलीपुरता याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी पात्रता ओळखावी. मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही; पण उदाहरणासाठी विक्रांत सावंत यांना पात्रता नाही. त्यांनी टीका करणे योग्य नाही. कोण सांगतो, याची खातरजमा करून त्याला प्रसिद्धी द्यावी. यापुढे राणे कुटुंबीयांविषयी बदनामीकारक टीका झाल्यास स्वस्थ बसणार नाही, असेही राणे म्हणाले.