राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश २२ ला?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश गेले काही दिवस लांबणीवर पडला असला तरी आता या प्रवेशाची तारीख जवळ आली आहे. येत्या २२ सप्टेंबरला मुंबईत मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती पुढे आली आहे.

कणकवली - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश गेले काही दिवस लांबणीवर पडला असला तरी आता या प्रवेशाची तारीख जवळ आली आहे. येत्या २२ सप्टेंबरला मुंबईत मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती पुढे आली आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह बडे नेते भाजपच्या वाटेवर असून, सर्वांचा एकत्रित प्रवेश होण्याची चिन्हे आहेत. यामुळे सत्ताधारी भाजपकडून मोठा राजकीय भूकंप घडवून आणला जाईल, अशी चर्चा आहे. 

देशभरात हरहर मोदी घरघर मोदी आणि शतप्रतिशद भाजपचा नारा दिला जात आहे. भाजपने आता मिशन २०१९ ची तयारी सुरू केली आहे. ही तयारी करत असताना बड्या नेत्यांना भाजपकडे आणले जात आहे. याचे कारण पुढील महिन्यात राज्यातील ७ हजार ५६७ ग्रामपंचायतीच्या तसेच थेट सरपंच निवडणुका होत आहेत. त्यातच राज्यात भाजपने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविण्याचा प्रयत्न आतापासूनच सुरू केला आहे. अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार आणि आमदारांची हजेरी घेतली होती. या बैठकीत पुढील रणनीतीची चर्चा झाली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकांसाठी काही अवधी उरला आहे. तत्पूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची घरभरवणी लवकरच होणार आहे.

सध्या येत्या २२ किंवा २३ ला हा पक्षप्रवेश असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात याबाबत सुरू असलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते राणेंच्या सोबत थेट प्रवेश करतील; मात्र काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्यांचा प्रवेश होणार नाही. पक्षांतर्गत कायदा लक्षात घेवून पुढील पावले टाकली जातील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका याच वर्षी झाल्या. त्यामुळे पुढील चार वर्षांच्या कालखंडासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून हे सदस्य कार्यरत राहणार का हा प्रश्‍न आहे. 

यापूर्वी २००५ मध्ये श्री. राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले होते. तेव्हाही स्थानिक संस्थामधील पदाधिकाऱ्यांनी अधिकृत प्रवेश केला नव्हता; मात्र भाजपमध्ये पदसिद्ध सदस्य बनविण्याची प्रक्रीया आहे. पक्षाचे हे पदाधिकारी अधिकृत असले तरच व्यासपीठावर दिसणार आहेत. यामुळे राणेंची पुढील निती काय असेल हे कथीत पक्षप्रवेशानंतरच स्पष्ट होणार आहे. राणेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला जवळपास पाच महिन्याचा कालावधी लोटला; मात्र मुहुर्ताच्या तारखा निश्‍चित झालेल्या नाहीत. पण कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडण्याची मानसिकता केली आहे.

जिल्हा आणि तालुकास्तरावरील सर्व बैठकामध्ये श्री. राणे घेतील तो निर्णय मान्य असा सूर उमटला. जिल्ह्यापासून गावपातळीपर्यंत काँग्रेस पक्षाची हातनिशाणी ही हळूहळू बाजूला सारली गेली आहे. अनेकांनी तिरंगा सोडून भगवा हातात घेण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु त्याला मुर्त स्वरूप येईना. श्री. राणे हे काँग्रेस सोडून जाणार हे लक्षात घेवून प्रदेश काँग्रेस पातळीवर जुन्या काँग्रेसच्या लोकांची शोधमोहीम सुरू झाली आहे.

ग्रामपंचायत लढतींचे चित्र कसे?
जिल्ह्यात गेली १२ वर्षे अनेक सत्तेत बहुमत असलेला काँग्रेस पक्ष राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशानंतर अचानक रसातळाला जावू नये याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे गावागावातीलही जुने काँग्रेस कार्यकर्ते काय निर्णय घेणार हे चित्र राणेंच्या भाजप प्रवेशानंतर स्पष्ट होईल. तसे झाले तर ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुका या राणे समर्थक विरूद्ध इतर अशाच लढविल्या जातील. किंबहुना गेल्या २५ वर्षात सुरू असलेला राजकीय संघर्ष याहीपुढे कायम राहील, असे मानले जात आहे.