राणेंचा संभाव्य भाजपप्रवेश स्वार्थापोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कुडाळ - नारायण राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश हा केवळ स्वार्थापोटी व दोन्ही मुलांच्या भवितव्यासाठी आहे. सोमवारचे त्यांचे शक्तिप्रदर्शन कोणासाठी व कशासाठी? या जिल्हावासीयांना पडणाऱ्या प्रश्‍नाचे उत्तर त्यांनी द्यावे, असे पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक यांनी येथे सांगितले.

कुडाळ - नारायण राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश हा केवळ स्वार्थापोटी व दोन्ही मुलांच्या भवितव्यासाठी आहे. सोमवारचे त्यांचे शक्तिप्रदर्शन कोणासाठी व कशासाठी? या जिल्हावासीयांना पडणाऱ्या प्रश्‍नाचे उत्तर त्यांनी द्यावे, असे पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक यांनी येथे सांगितले.

आमदार श्री. नाईक यांनी ग्रामपंचायत निवडणुका, नारायण राणे पक्षप्रवेश व शिवसेना जिल्हा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, संजय पडते, राजन नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, पिंगुळी उपसरपंच मिलिंद परब, उपतालुकाप्रमुख संदीप राऊळ, संदेश प्रभू, नगरसेवक सचिन काळप, संदीप म्हाडेश्‍वर, सतीश कुडाळकर, रमा धुरी, बबन बोभाटे, नितीन सावंत, सागर जाधव, गंगाराम सडवेलकर आदी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले, ‘शुक्रवारी (ता.२२) शिवसेनेचा जिल्हा मेळावा येथील महालक्ष्मी सभागृहात सकाळी ११ वाजता शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, सचिव तथा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जिल्ह्याची जबाबदारी श्री. देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. गेले काही महिने नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा होती. जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर त्यांचे आजचे शक्तिप्रदर्शन कशासाठी व कोणासाठी हा जिल्हावासीयांना प्रश्‍न पडला आहे. शिवसेनेने त्यांची हकालपट्टी केल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते सोनिया गांधी यांचे नेतृत्व मानू लागले. दरम्यानच्या काळावधीत काही वर्षापूर्वी काँग्रेसवरही त्यांनी जोरदार टीका केली होती. आता जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर काँग्रेसवर जोरदार टीका सुरू केली. ते केवळ स्वार्थासाठी व दोन्ही मुलांच्या भवितव्यासाठी भाजपत जात आहेत. कोणत्याही पक्षात जातांना त्यांच्याकडे टिकेपलीकडे काही नाही. ते करत असणाऱ्या प्रवेशाबाबत त्यांनी जिल्हावासीयांना उत्तर दिले पाहिजे.’’ 

ते म्हणाले, ‘‘आगामी  ग्रामपंचायत निवडणुकीत ५४ पैकी ४० ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा पडकविणार आहोत. आता आमच्याकडे तेंडोली, कवठी, नेरुर, हळदीचे नेरुर, पिंगुळी, पुळास, सोनवडे या सात ग्रामपंचायती आहेत.’’

दलवाईंची जागा भांडारी घेतील
राणे काँग्रेसमध्ये असताना हुसेन दलवाई सिंधुदुर्गात निरीक्षक म्हणून आले. आता राणेंच्या भाजप प्रवेशानंतर तीच अवस्था निरीक्षक म्हणून माधव भांडारी यांच्यावर येईल असा टोला श्री. नाईक यांनी हाणला.