'राणे मंत्रिमंडळात येतील त्या क्षणाला सत्तेला लाथ मारू'

narayan rane
narayan rane

सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांचा कणकवलीत इशारा

कणकवली (सिंधुदुर्ग): ज्या क्षणी राणेंचा मंत्रीमंडळात प्रवेश होईल. त्याच क्षणी शिवसेना सत्तेला लाथ मारणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार विनायक राऊत यांनी आज (शनिवार) येथे केले. नाणार प्रकल्प जबरदस्तीने येऊ घातल्यास शिवसेना आपली ताकद दाखवेल, असा इशाराही देण्यात आला.

शिवसेनेचा कणकवली विधानसभा मतदारसंघ मर्यादित निर्धार मेळावा आज येथील मातोश्री मंगल कार्यालयात झाला. यात शिवसेनेचे मंत्री आणि नेतेमंडळींनी नारायण राणे आणि त्यांच्या स्वाभिमान पक्षावर जोरदार टीका केली. कणकवली नगरपंचायतीसह राज्याच्या विधानभवनावर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याची ग्वाही दिली.

निर्धार मेळाव्याला पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या स्नेहा तेंडुलकर, जान्हवी सावंत, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, युवासेना प्रमुख ऍड हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

सुभाष देसाई म्हणाले, "राणेंनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला आहे. त्यांना शिवसेना कधीच माफ करणार नाही. तसेच राणे केंद्रात जावोत अथवा राज्यात, जेथे जातील तेथे त्यांना भुईसपाट करण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. राणेंनी आपल्या पक्षाचे नाव स्वाभिमान ऐवजी स्वार्थाभिमान ठेवायला हवे.''

एकनाथ शिंदे म्हणाले, "काही मंडळींनी शिवसेना संपवायला निघाली होती. पण कुडाळ आणि बांद्राच्या जनतेने त्यांनाच धूळ चारली. त्यांच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही.''

विनायक राऊत म्हणाले, "राजकीय अस्तित्व संपलेल्या राणेंना रिफायनरी आंदोलनाचा आधार घ्यावा लागला. पण ज्यांनी औष्णिक प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला. तेथील जनतेला मारहाण केली. अणुऊर्जा प्रकल्प आणण्यातही महत्वाची भूमिका बजावली. त्या राणेंचे रिफायनरी विरोधातील आंदोलन हे पुतना मावशीचे प्रेम आहे.''

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग आणि कोकणसाठी केलेल्या तरतूदींची माहिती दिली. वेंगुर्लेत पुढील नऊ महिन्यात पाणबुडी येईल. तसेच लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती होईल अशी ग्वाही दिली. शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कणकवली नगरपंचायत, कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनाच विजयी होईल अशी ग्वाही दिली. आमदार वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात जसा राणेंचा पराभव करण्यासाठी शिवसैनिक झटले, तशीच ताकद कणकवलीतही दाखवूया असे आवाहन केले.

शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात वागदेचे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर तसेच शिरगाव येथील पूर्वा सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com