राणे काढणार स्वतंत्र पक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सावंतवाडी -  माजी मुख्यमंत्री नारायण राणे स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. भाजपनेच हा फॉर्म्युला शोधून काढल्याचे समजते. भाजप त्यांना या बदल्यात कॅबिनेट मंत्रिपद देणार आहे. 

सावंतवाडी -  माजी मुख्यमंत्री नारायण राणे स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. भाजपनेच हा फॉर्म्युला शोधून काढल्याचे समजते. भाजप त्यांना या बदल्यात कॅबिनेट मंत्रिपद देणार आहे. 

कॉंग्रेस सोडल्यानंतर राणे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता होती. दसऱ्याआधी निर्णय जाहीर करणार असल्याचे या आधी त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची राणे यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री चंद्रकांत पाटील होते. बैठकीत काय झाले, याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली नव्हती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने राणेंसाठी स्वतंत्र पक्षाचा फॉर्म्युला सांगितला आहे. यानुसार राणे आपल्या पक्षाची घोषणा लवकरच करतील.

हा पक्ष एनडीएचा सहयोगी पक्ष बनेल. त्यामुळे भाजप त्यांना राज्य मंत्रिमंडळात सामावून घेणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. याचवेळी राणेंचा शपथविधी होऊ शकतो. 

स्वतंत्र पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांचे पुत्र नीतेश राणे कॉंग्रेस सोडून या पक्षात येणार का, याची उत्सुकता आहे. त्यांचे दुसरे समर्थक कालिदास कोळंबकर हेही काय पाऊल उचलतात, याची उत्सुकता आहे. स्वतंत्र पक्ष काढल्यास तो चालविण्यासाठीची सगळी ताकद राणेंना उभी करावी लागणार आहे. राणेंसाठी ही राजकारणातील नवी इनिंग खूप मोठे आव्हान घेऊन येणारी ठरणार आहे. 

पुन्हा आमदार होण्याचे आव्हान 
राणेंनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपने त्यांना मंत्रिपद दिल्यास सहा महिन्यांत पुन्हा निवडून यावे लागणार आहे. त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे; मात्र एकाच पदासाठी लढत असल्याने राणेंना विजय मिळविणे सहज असणार नाही. त्यांच्या विरोधात दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास कमी पडणाऱ्या मतांची जुळणी करावी लागणार आहे. यात राणेंचे विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध उपयोगी पडतील, असा राजकीय अभ्यासकांचा होरा आहे. 

राणेंकडून रविवारी पुढील दिशा स्पष्ट 
राणे रविवारी (ता. 1) मुंबईत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. नरिमन पॉंईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन ते पुढची दिशा जाहीर करणार आहेत. त्यांच्या भाजपशी संबंधित निर्णयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. श्री. फडणवीस सध्या परदेशात आहेत. ते 29 ला परतणार आहेत. यानंतर या सगळ्या प्रक्रियेला अधिक गती येण्याची शक्‍यता आहे.