राणेंनी पुन्हा आजमावला ‘रिस्क फॅक्‍टर’

शिवप्रसाद देसाई
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

सावंतवाडी -  रिस्क जितकी मोठी, तितके यशही मोठे; पण धोकाही तितकाच जास्त. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची अख्खी राजकीय कारकीर्दच या फॅक्‍टरवर उभी राहिली. आताही त्यांनी खूप मोठी ‘रिस्क’ घेण्याची तयारी केली आहे. फरक इतकाच की, या वेळी त्यांच्याबरोबरच त्यांच्या दोन्ही मुलांच्या राजकीय प्रवासाची पुढची दिशा यावर ठरणार आहे.

सावंतवाडी -  रिस्क जितकी मोठी, तितके यशही मोठे; पण धोकाही तितकाच जास्त. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची अख्खी राजकीय कारकीर्दच या फॅक्‍टरवर उभी राहिली. आताही त्यांनी खूप मोठी ‘रिस्क’ घेण्याची तयारी केली आहे. फरक इतकाच की, या वेळी त्यांच्याबरोबरच त्यांच्या दोन्ही मुलांच्या राजकीय प्रवासाची पुढची दिशा यावर ठरणार आहे.

आक्रमक, बेधडक नेता अशी ओळख राणेंनी शिवसेनेत पाऊल ठेवल्यापासून निर्माण केली. यामुळेच सिंधुदुर्गसारख्या सगळ्यात छोट्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असूनही राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांनी मिळविले. आजही विधानसभेतील पराभव आणि सत्तेतील पक्षात नसतानाही त्यांनी आपला दरारा कायम राखला. संधी मिळेल तिथे आणि संधी नसेल तिथे ती निर्माण करून राजकीय रिस्क घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते वेगाने ‘मास लीडर’ बनले.

२००५ ला त्यांनी अशीच राजकीय रिस्क घेतली होती. तेव्हा विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे होते. तेव्हाही त्यांची राजकीय कारकीर्द वाघासारखी होती. शिवसेनाप्रमुखांकडे पक्षाची सर्व सूत्रे होती. याच शिवसेनाप्रमुखांनी त्यांना राज्याच्या सर्वोच्च स्थानावर बसविले होते. एखाद्याने शिवसेना सोडणे किती अवघड आहे याचे चित्र या आधी झालेल्या छगन भुजबळ यांच्या पक्षांतरानंतरच्या घडामोडीमुळे तयार झाले होते. असे असतानाही राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका करत बेधडकपणे शिवसेना सोडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय ताकदीच्या जोरावर पोटनिवडणुकीला सामोरे गेले.

शिवसेनेवर पराभवाची खूप मोठी नामुष्की ओढवली. त्यांनी पूर्ण संघटनेलाच आव्हान दिले; मात्र मागे वळून बघताना काँग्रेसमध्ये २००५ पासून आतापर्यंत त्यांनी काय कमावले आणि काय गमावले याच्यात जमापेक्षा खर्चच जास्त असल्याचे दिसते. 
मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी ते काँग्रेसमध्ये आले हे आता लपून राहिलेले नाही; मात्र गेल्या १२ वर्षांत त्यांचे जीवाभावाचे बरेच सहकारी, हक्काचे कार्यकर्ते सोडून गेले. त्यांना महसूल, उद्योग अशा मंत्रिपदावर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांचे पुत्र डॉ. नीलेश राणे खासदार झाले तरी त्यात पक्षाच्या श्रेयापेक्षा राणेंचेच कर्तृत्व मोठे होते; मात्र याच काँग्रेसमधून त्यांना लोकसभेचा पराभव पाहावा लागला. दुसरे पुत्र नीतेश हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले तरी त्यातही पक्षापेक्षा वैयक्तिक मतांनीच त्यांना जास्त साथ दिली.

आयुष्यात कधीच पराभव न पाहिलेल्या राणेंना काँग्रेसच्या तिकिटावरच कुडाळमधून पराभव पत्करावा लागला. जिल्ह्यातील लोकप्रियतेत शिवसेनेच्या काळाशी तुलना करता घट झाली. दीपक केसरकर, विनायक राऊत असे राजकीय प्रतिस्पर्धी प्रबळ होत असताना राणे त्यांना रोखू शकले नाहीत. पक्षांतर्गत बंड करण्याची वेळही त्यांच्यावर अनेकदा आली. एकूणच काँग्रेसमधली त्यांची कारकीर्द शिवसेनेप्रमाणे चढता आलेख दाखविणारी राहिली नाही.

आता पुन्हा राणे काँग्रेसपासून फारकत घेत नवा राजकीय डाव मांडण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपमध्ये जाणार की नाही याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. भाजपही सरळ राजकारण न करता बुद्धिबळातील डाव मांडणारी संघटना आहे. त्यात राणेंसारखा आक्रमक आणि सरळ चालणारा नेता किती यशस्वी होऊ शकतो हा प्रश्‍नच आहे. राणेंना केंद्रापेक्षा राज्याच्या राजकारणात जास्त रस आहे यात शंका नाही. ते भाजपमध्ये गेले तरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात असणार हे नक्की. ते भाजपमध्ये आले तरी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
 हे त्यांना प्रतिस्पर्धी मानणार यात शंका नाही. त्यामुळे भाजपच्या प्रवासातही त्यांना काँग्रेससारखीच स्पर्धा करावी लागेल असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याशिवाय त्यांच्या दोन्ही पुत्रांची राजकीय कारकिर्दही या निर्णयाशी जोडलेली असणार आहे.

नितीन गडकरी राणेंना भाजपमध्ये घ्यायला अधिक उत्सुक आहेत. गडकरी दिल्लीत असले तरी राज्याच्या राजकारणातील त्यांचा रस कायम आहे. त्यामुळे राणेंच्या रूपाने आपला आक्रमक माणूस येथे आणण्याची खेळी ते खेळू शकतात. या शिवाय कोकणात ग्रीन रिफायनरी, नवे महामार्ग, नवी बंदरे असे हजारो कोटींचे प्रकल्प येऊ घातले आहेत. यातील काही प्रकल्पांना आतापासूनच विरोध सुरू झाला आहे. पूर्ण कोकणात ‘होल्ड’ असलेला नेता भाजपकडे नाही. हे प्रकल्प पुढे रेटायचे असतील तर राणेंसारख्या नेतृत्वाची त्यांना गरज आहे.

शिवाय भाजपची अंतर्गत स्पर्धा शिवसेनेशी आहे. शिवसेनेची ताकद रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये टिकून आहे. त्याला सुरूंग लावण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकणार आहे. त्यामुळे भाजप राणेंसाठी पायघड्या पसरू शकते; मात्र शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याचे हत्यार उपसल्यास भाजप काय भूमिका घेणार हा प्रश्‍न आहे.
 

काँग्रेसची अनपेक्षित चाल
राणेंनी या आधी काँग्रेसमध्ये राहून बंड केल्याची उदाहरणे आहेत. गेले अनेक दिवस ते प्रदेशाध्यक्षांवर टीका करत आहेत; काँग्रेसने यावर कोणतेच उत्तर दिले नव्हते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने राणे समर्थकांचा प्रभाव असलेली कार्यकारिणी बरखास्त करून राणेंसाठी अनपेक्षित चाल खेळली.