सिंधुदुर्गात एटीएम खडखडाट कायम

सिंधुदुर्गात एटीएम खडखडाट कायम

कणकवली - एटीएममधून होणारा रोकड पुरवठा अद्याप सुरळीत सुरू झाला नसल्याने जिल्ह्यात एटीएम खडखडाटची समस्या कायम आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध होत नसल्याचे चलन टंचाई निर्माण झाल्याची शक्‍यता विविध बॅंक अधिकाऱ्यांकडून व्यक्‍त करण्यात आली. तर दोन हजार रूपयांचा नोटा दाबून ठेवण्यात येत असल्याने पाचशे रूपयांच्या नोटांवर ताण आल्याचीही चर्चा बॅंकींग क्षेत्रात आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून एटीएम मशिनमध्ये खडखडाट असल्याने पुन्हा नोटा बंदी तर होणार नाही ना? अशी शंका ग्राहकांतून व्यक्‍त केली जात आहे. चलन टंचाईमुळे बाहेर गावाहून आलेल्या पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत. सध्या शाळांच्या परीक्षा संपत आल्याने प्रत्येक पालक मुलांना घेऊन पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे बेत आखत आहेत. अशावेळी हाताशी रोकड असावी म्हणून, तसेच पर्यटनस्थळी गेल्यावर तेथे खर्चण्यासाठी आयत्या वेळेस पैसे काढता येतील या भरवशावर एटीएमवर अवलंबून राहणे लोकांना महागात पडत आहे.

आज अक्षयतृतीया असल्याने मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक, इलेक्‍ट्रीकल वस्तू, कपडे, भांडी, सुवर्णपेढ्या आदी दुकानांमध्ये गर्दी झाली होती. यात अनेक ग्राहकांकडे चलनी नोटांची कमरता असल्याने डेबिट, क्रेडीट कार्ड वापरावी लागली. तर काही ग्राहकांची चलन पुरवठा व्यवस्थित होईपर्यंत खरेदी पुढे ढकलली होती.

चलन टंचाईबाबत स्टेट बॅंक व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, रिझर्व्ह बॅंकेकडून आवश्‍यक त्या प्रमाणात रोकड पुरवठा होत नसल्याने चलन टंचाईची स्थिती निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. सध्या पर्यटन हंगाम, तसेच पावसाळ्यापूर्वीची बाजार खरेदी, नव्या घरांची बांधकामे व इतर कामे सुरू असल्याने रोकड जास्त प्रमाणात लागत आहे. याखेरीज बॅंकिंग नेटवर्कमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने ऑनलाईन व्यवहारांपेक्षा रोकडमध्येच अधिक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे चलनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने चलन टंचाई निर्माण झाली असावी असे सांगण्यात आले.

नोटा दाबून ठेवल्याने चलन तुटवड्याची शक्‍यता
दोन हजार रूपयाच्या नोटा बंद होणार असल्याचे कोणतेही आदेश रिझर्व्ह बॅंकेकडून आले नसल्याची माहिती महाबॅंक व्यवस्थापनाकडून देण्यात आली; मात्र दोन हजार रूपयांच्या नोटा चलनात येण्याऐवजी कुठेतरी दाबून ठेवल्या जात असाव्या. यामुळे पाचशे रूपयांच्या चलनावर मोठा ताण आला आहे. त्याचाही परिणाम चलन तुटवड्यावर झाला असण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात आली. 

चलनाची मागणी वाढल्याची परिणाम
सद्यस्थितीत सर्व एटीएम मशिनमध्ये पुरेशा प्रमाणात रोकड ठेवली जात आहे; मात्र रोख रक्‍कमेची मागणीच जास्त असल्याने रोकड लवकर संपत असल्याचे महाबॅंकेकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com