प्राथमिक शिक्षकांची यंदा पगाराविनाच दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

कणकवली -: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना यंदाची दिवाळी पगाराविनाच होणार आहे. मुख्याध्यापकांचे समयोजन रखडल्याने त्यांचे पगार देणे शासनाने बंद केले आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनीही आपल्या शाळांतील शिक्षकांच्या पगाराची बिले पुढे पाठविलेली नाहीत. हा प्रश्‍न सोडविण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने, शाळांमध्ये मुख्याध्यापकविरोधात एकवटलेले सर्व शिक्षक असे गटबाजीचे वातावरण तयार झाले आहे.

कणकवली -: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना यंदाची दिवाळी पगाराविनाच होणार आहे. मुख्याध्यापकांचे समयोजन रखडल्याने त्यांचे पगार देणे शासनाने बंद केले आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनीही आपल्या शाळांतील शिक्षकांच्या पगाराची बिले पुढे पाठविलेली नाहीत. हा प्रश्‍न सोडविण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने, शाळांमध्ये मुख्याध्यापकविरोधात एकवटलेले सर्व शिक्षक असे गटबाजीचे वातावरण तयार झाले आहे.

संचमान्यतेनुसार सिंधुदुर्गातील ३९३ मुख्याध्यापक अतिरिक्‍त ठरले आहेत. या शिक्षकांना त्याच किंवा अन्य शाळेत उपशिक्षक किंवा पदवीधर शिक्षक म्हणून काम करावे, असे निर्देश शासनाने दिले. याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी याला हरकत घेतली.
जिल्ह्यात एकूण १४५५ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यात एकूण ४१३ मुख्याध्यापकांची पदे मंजूर होती. शासनाने संच मान्यतेचा निकष लागू केल्याने फक्त २० शाळांतील मुख्याध्यापकांची पदे कायम ठेवली तर ३९३ मुख्याध्यापक पद अतिरिक्‍त ठरविले.

मुख्याध्यापकांनी उपशिक्षक किंवा पदवीधर शिक्षकाचा कार्यभार स्वीकारला, तरच त्यांचे वेतन अदा करण्याची भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. परंतु अनेक मुख्याध्यापकांनी पदानवत होण्यास नकार दिला आहे. 

शिक्षकांच्या पगाराची बिले ही ऑनलाइन पद्धतीने मुख्याध्यापकांच्या लॉगिनने पाठविली जातात. जिल्ह्यातील अतिरिक्‍त मुख्याध्यापकांचा सप्टेंबर २०१७ चे वेतन काढण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी आपल्या लॉगिनवरून शिक्षकांच्या वेतनाची बिले देखील पुढे पाठविलेली नाहीत. मुख्याध्यापकांनी आपल्या प्रशालेतील शिक्षकांच्या पगाराची बिले पुढे पाठविलेली नाहीत. याच मुद्दयावरून मुख्याध्यापक विरोधात शिक्षक असा नवा संघर्ष सुरू झाला आहे.

सर्वांचाच पगार रखडला...
मुख्याध्यापकांच्या समयोजनाचा प्रश्‍न निकाली लागेल तेव्हा लागेल, तोपर्यंत इतर शिक्षकांचा खोळंबा नको म्हणून काही मुख्याध्यापकांनी स्वत:हून पुढाकार घेतला. वेतनातून स्व:ला वगळून इतर शिक्षकांची बिले पुढे पाठविली. मात्र, संपूर्ण तालुक्‍यातील सर्व शिक्षकांच्या पगार बिलाची रक्‍कम एकत्र करूनच पगार देण्याची कार्यवाही आजवर केली जात आहे. त्यामुळे सर्वच शिक्षकांचा पगार रखडला आहे. 

मुख्याध्यापकांना नोटिसा...
शिक्षकांची वेतन देयके मुख्याध्यापक लॉगिनवरून पाठविण्यात न आल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांतील मुख्याध्यापकांना त्वरित वेतन देयके सादर करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यात वेतन देयकात अडचण निर्माण झाल्यास, त्याची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल असे नमूद करण्यात आले आहे, मात्र गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अशी कोणतेच पत्र आले नसल्याचा दावाही अनेक मुख्याध्यापकांनी केला आहे.