‘ओखी’ने ‘फयान’ च्या आठवणी ताज्या

मालवण ः बंदर जेटीनजीकच्या समुद्रात बुडालेली पोलिसांची गस्तीनौका किनाऱ्यावर आणताना मच्छीमार.
मालवण ः बंदर जेटीनजीकच्या समुद्रात बुडालेली पोलिसांची गस्तीनौका किनाऱ्यावर आणताना मच्छीमार.

‘फयान’नंतर ‘ओखी’ 
दहा वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीवर फयान वादळ धडकले होते. असे वादळ सुमारे ४२ वर्षांनंतरच कोकण किनारपट्टीवर धडकले होते. साहजिकच एका पिढीने असं वादळ पहिलंच काहीतरी अनुभवलं होतं. शासनाने म्हणावी तशी दखल या वादळाची घेतली नव्हती अन्‌ मग व्हायचे तेच झाले. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त. आजही अनेक लोक आपले नातेवाईक येतील या अपेक्षेने त्या सागराकडे डोळे लावून बसलेत.

‘फयान’च्या स्मृतीमुळे आजही वेदना
ज्यांनी ते फयान वादळ अनुभवलं, त्यांना आजही त्या वादळाच्या आठवणी वेदना देऊन जातात. कारण अनेक मच्छीमारांचं फयान वादळ होत्याचं नव्हत करून गेलं. अनेकांना काय होतं हे समजलंही नाही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वादळ कोकणच्या दिशेने येणार आहे हे प्रशासनाला माहीत असूनही कोणीही गंभीरपणे घेतले नव्हते आणि अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले होते.

जखमा विरलेल्या नाहीत
फयान वादळाच्या जखमा आजही विरलेल्या नाहीत. कारण अनेक महिलांचे पती आजही माघारी फिरलेले नाहीत. अनेकांनी ते परत यावेत यासाठी देव पाण्यात ठेवले होते; मात्र म्हणतात ना, कधी कधी देवालाही पाझर फुटत नाही. अशीच काहीशी अवस्था या काही मच्छीमारांची झाली आहे. देवगडमध्ये हा फटका सर्वाधिक बसला होता. कारण देवगडमधून अनेक मच्छीमार खोल समुद्रात गेले होते; मात्र त्यांना या वादळाची कल्पना नव्हती. त्यामुळे ते कायमचे या जगातून निघून गेले.

 वादळाप्रमाणे नेते येतात...
वादळ म्हणा किंवा अन्य आपत्ती म्हणा, या आपत्तीत नेते येतात-जातात आणि फक्त आश्वासन देतात. असंच इथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. यावेळच्या वादळाचाही फायदा अगदी सर्वच राजकीय नेत्यांनी घेतला. कोण आधी पोहोचतो एवढ्यावरच हे मर्यादित राहिलं; मात्र जे फयान वादळाबाबत घडलं, ते या वादळात अनुभवता येऊ नये, अशी अपेक्षा वादळात अडकलेले मच्छीमार करत आहेत.

 ग्लोबल वॉर्मिंगची नांदी...
यावेळच्या वादळाने अनेक गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. यापैकी महत्त्वाचं म्हणजे पाण्याची पातळी यावेळी कमालीची वाढली. यापूर्वी एवढी समुद्राच्या पाण्याची पातळी कधीच वाढली नव्हती. समुद्राचं पाणी एवढं वाढू शकतं हे प्रथमच इथल्या लोकांनी अनुभवलं. ग्लोबल वॉर्मिंगबाबत नेहमीच चर्चा होत असतात; मात्र याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाहीय. आता तरी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता आहे हे या वादळाने दाखवून दिलं आहे. अनेक बाबींमुळे कोकणात सध्या पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यावरणवादी याकडे लक्ष देण्याचं सुचवत आहेत; मात्र कोणीही याकडे लक्ष देत नाहीय. आता मात्र या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्‍यक आहे.

मदत यंत्रणेचे स्थानिकांकडे दुर्लक्ष
या वादळात तामिळनाडू, केरळ आणि गुजरात या राज्यांतून अनेक मच्छीमारी नौका सिंधुदुर्गात आल्या होत्या. साहजिकच प्रशासनाचं सगळं लक्ष होतं त्यांच्याकडेच. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांकडे दुर्लक्ष झालं आणि याचा फटका सगळ्या स्थानिकांना बसला. अजून अनेकांच्या नुकसानीचे पंचनामेही झाले नाहीत. पंचनामे न झाल्याने अनेक मच्छीमार मदतीपासून वंचित राहण्याची  शक्‍यता आहे.

मासे सुकविणारे वंचित नकोत...
या वादळात सर्वाधिक नुकसान जर कोणाचे झाले असेल तर ते मासे सुकविणाऱ्यांचे. पावसाची अपेक्षा नसल्याने अनेक मच्छीमारांनी किनाऱ्यावर मासे सुकत घातले होते. अशी कोट्यवधी रुपयांची  मासळी पावसाने खराब झाली आहे; तर पर्यटन व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे. ऐन पर्यटन हंगामात हा धक्का बसला असल्याने मच्छीमार सावरणार कसा? त्याचं नुकसान भरून येणार कसं...?

ओखी वादळाने यावेळी जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठी झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी शासनाचं लक्ष हे परप्रांतीय बोटीकडे होतं. त्यामुळे स्थानिकांना मदत सोडाच, कोणी आधारही दिला नाही. आमच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हापासून आम्ही सर्व लक्ष स्थानिक मच्छीमारांकडे दिले. आता वादळ होऊन गेलं आहे. काही गोष्टी यातून प्रामुख्याने समोर आल्या आहेत. यापैकी महत्त्वाची  गोष्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृती होणे आवश्‍यक आहे. वादळात नुकसान झालेल्या एकही मच्छीमाराला नुकसानीपासून वंचित राहावं लागणार नाही याकडे जातीनिशी लक्ष देणार आहे.
- विकी तोरसकर, मच्छीमार नेते

दृष्टिक्षेपात...

  •  ‘ओखी’मुळे फयान वादळाच्या स्मृती जाग्या

  •  फयान वादळातील मच्छीमार अद्यापही मदतीपासून वंचित

  •  ‘ओखी’तील नुकसानीचे पंचनामे अर्धवट 

  •  ऐन हंगामात व्यवसायाचे नुकसान  मासे सुकविणारे मोठ्या अडचणीत

देवगडमध्ये या दरम्यान तमिळनाडूच्या ५, केरळच्या ५८ गुजरातच्या २२५, गोव्याच्या ३ अशा एकूण २९१ बोटी दाखल झाल्या होत्या. या बोटींना डिझेल पुरविणे, त्यांना वेद्यकीय मदत तसेच इतर मदत शासनाने पुरविली आहे. ही मदत पुरविताना स्थानिकांकडे कुठेही दुर्लक्ष होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिला होता. फयान वादळाचा विचार करता यावेळी शासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने वित्तहानी कमी झाली तर कुठेही जीवितहानी झाली नाही.
- अमोल ताम्हणकर, बंदर अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com