सिंधुदुर्गात भातशेतीवर घोंघावते किडीचे संकट

भूषण आरोसकर 
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

जिल्ह्यात भातशेतीवर करपा व निळे भुंगेरेचे संकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. भातशेती फुलोऱ्याच्या ३१ हेक्‍टर क्षेत्रावर करपा व निर्माण झाला आहे. तर अद्यापर्यत ३ हेक्‍टर क्षेत्रावर निळे भुुंगेऱ्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. अल्पप्रमाण पावसाच्या सरिचा शिडकाव न झाल्यास आणखी काही हेक्‍टर क्षेत्र बाधित होण्याचा संभव आहे.

सावंतवाडी - जिल्ह्यात भातशेतीवर करपा व निळे भुंगेरेचे संकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. भातशेती फुलोऱ्याच्या ३१ हेक्‍टर क्षेत्रावर करपा व निर्माण झाला आहे. तर अद्यापर्यत ३ हेक्‍टर क्षेत्रावर निळे भुुंगेऱ्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. अल्पप्रमाण पावसाच्या सरिचा शिडकाव न झाल्यास आणखी काही हेक्‍टर क्षेत्र बाधित होण्याचा संभव आहे.

पावसाळ्याच्या उत्तरार्धात मोठ्या जिल्ह्यात करपा व निळे भुंगेरे या दोन्ही किडींचा शिरकाव होतो. दरम्यान भातशेती फूलोऱ्यावर असतानाच किरकोळ पावसाची गरज असते. अशातच सिंधुदुर्गात विशेषतः सावंतवाडी, मालवणचा काही भाग, कुडाळ परिसरातील भागात करपा रोगाचा शिरकाव होतो. येथील तालुक्‍यात भातशेतीचे मोठे क्षेत्र आहे, असे असतानाही वन्यप्राण्याच्या उपद्रवानंतर करपा या रोगाचा सामना करण्याची वेळ येणे हे दरवर्षीचे बनले आहे. येथील तालुक्‍यातील विशेषतः करपा सोबत निळे भुंगेरेची समस्या खरीपाच्या उत्पन्नातील घटास कारणीभूत ठरते. वेंगुर्ले, सावंतवाडी सोबत कुडाळ मध्ये निळ्या भुंग्याऱ्याच्या रोगाची लागण झालेली आहे.

भातशेतीच्या दाणा धरण्याच्या (पळींज) महत्वाच्या काळात भातशेती पुन्हा एकदा संकटात येण्याच्या मार्गावर आहे. या महत्वाच्या टप्प्यात ४ ते ५ हेक्‍टरवर निळ्या भुंग्याऱ्याचाही प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यात कडधान्य पिक ५०० हेक्‍टर क्षेत्रावर तर कुळीथ ३७० हेक्‍टरक्षेत्रावर, नाचणी १ हजार ८०० हेक्‍टर क्षेत्रावर तर भूईमुग ६०० हेक्‍टर क्षेत्रावर आले आहे. सर्वपिके ४० टक्‍याच्याही वर आली असल्याने भईमुग पिकाला भर देण्याचे काम वेगात आहे.

 पिकांच्या अशा स्थितीत पाऊसाच्या भूमिकेकडे बळीराजा सोबत कृषी अधिकाऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. मोठ्या स्वरुपाचा पाऊस भात पिकांच्या कणसातील दाणा पोल करु शकतो, अशी शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. यामुळे पाऊस समाधानकारक आणि करपा पासून पिकांचे संरक्षण झाल्यास बळीराजाला पिक उत्पन्नातून समाधान प्राप्त होवू शकते. निसर्गापुढे कोणतेही उपचार नसले तरी करपा व निळे भुंगेरेसाठी औषध फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला आहे. यंदाच्या वर्षी नवी औषधे उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले असून बाधित क्षेत्रासाठी गतवर्षीचा औषध पुरवठा उपलब्ध आहे. यात सीओसी गंधक, सीमेक्रॉन, कारवॉईल अशा औषधांचा समावेश करपासाठी उपयुक्त आहे.

चांगले उत्पन्न मिळण्याची आशा
जिल्ह्यातील ५३ हजार ३२० हेक्‍टर क्षेत्रावर भातशेती लागवड केली होती. सद्यस्थितीत ५ टक्के भातपिक हे लोंबे बाहेर पडण्याच्या स्थितीत (पोटरी) बाकी आहे. त्यापैकी आता ४० टक्के भातशेती फुलोऱ्यावर असल्याची माहिती देण्यात आली आहे; मात्र वेळीच करपावर नियंत्रण मिळविणे शक्‍य झाल्यास यंदा गतवर्षीपेक्षा पीक उत्पन्नही चांगले मिळू शकते.

स्थितीत सुधारणेसाठी दुपारनंतर पाऊस होणे आवश्‍यक आहे. सद्य:स्थितीत अल्प प्रमाणात होत असलेला पाऊस भातपिकाला फायदेशीर ठरू शकतो; मात्र करपा व निळे भुंगेरेबाधित क्षेत्रात शेतकऱ्यांनी औषध फवारणी केल्यास त्याचा फायदा रोगावर नियंत्रण आणण्यासाठी होऊ शकतो.
- अरुण नातू, 
कृषी तांत्रिक अधिकारी सिंधुदुर्ग