सिंधुदुर्ग भाजप होणार हायटेक - प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

देवगड - जिल्हाभरात यापुढे एकाच वेळी दर महिन्याच्या ११ तारखेला भाजपच्या स्थानिक समित्यांच्या बैठका घेतल्या जातील. बूथनिहाय बूथप्रमुखासह १० प्रमुख कार्यकर्ते आणि २५ सदस्यांचा समावेश असलेली समिती मोबाईल ॲपद्वारे राष्ट्रीय कार्यकारिणीशी जोडली जाणार असून, भाजप जिल्ह्यात आता हायटेक होणार असल्याचे संकेत भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी जामसंडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. 

जामसंडे येथील टिळक स्मारक सभागृहात भाजप तालुका कार्यकारिणी बैठक आणि तालुक्‍यातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर जठार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी भाजप नेते अतुल रावराणे, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, मुकुंद फाटक आदी उपस्थित होते. 

जठार म्हणाले, ‘‘राज्यातील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासनाच्या विविध योजना आणि सरकारची कामगिरी, विविध बैठका, मेळाव्यामधून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवली जाईल. हे अभियान येत्या २० पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व गाव समित्यांची बैठक एकाच दिवशी प्रति महिना ११ तारखेला होईल. प्रत्येक बूथच्या बूथप्रमुख, १० प्रमुख कार्यकर्ते आणि २५ सदस्य अशी एकूण ३६ जणांची समिती मोबाईल ॲपद्वारे केंद्रीय कार्यकारिणीशी संलग्न राहील. या ॲपची माहिती या अभियानादरम्यान बूथनिहाय भेट देऊन देण्यात येईल. त्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची ८ ला, कणकवलीची ९ ला, तर ११ ला कुडाळ-मालवणची बैठक होईल.’’ 

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ८ तालुका शहरे अशा एकूण ५८ ठिकाणी मेळावे घेतले जातील. विकासाचा आढावा आणि पाठपुरावा तालुका सरचिटणीस घेतील. सीएसआरच्या माध्यमातून गावागावांत किमान एक काम सुरू करण्याचे नियोजन आहे.’’ या वेळी त्यांनी प्रकाश सावंत (वळीवंडे) यांची भाजप तालुका उपाध्यक्षपदी, तर मनोज सावंत यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केल्याचे जाहीर केले.

अभिनंदन ठराव
गावातील विजेची समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक गावात ‘गाव विद्युत व्यवस्थापक’ नेमण्याच्या निर्णयाबद्दल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे, तर सिंधुदुर्गवासीयांसाठीचा गोव्यात सशुल्क उपचार करण्याचा निर्णय मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.