सावंतवाडीत मच्छी विक्रेत्यांना दीड वर्षापासून खुर्च्यांची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - मच्छी मार्केट आणि येथील पालिका पदाधिकाऱ्यांत झालेल्या बैठकीत विक्रेत्यांना देण्यात येणाऱ्या खुर्च्यांचा मुद्दा गाजला. आधुनिक मच्छीमार्केट उभारल्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतरसुद्धा मच्छी विक्रेत्यांना बसण्यास खुर्च्या मिळाल्या नाहीत, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.

सावंतवाडी - मच्छी मार्केट आणि येथील पालिका पदाधिकाऱ्यांत झालेल्या बैठकीत विक्रेत्यांना देण्यात येणाऱ्या खुर्च्यांचा मुद्दा गाजला. आधुनिक मच्छीमार्केट उभारल्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतरसुद्धा मच्छी विक्रेत्यांना बसण्यास खुर्च्या मिळाल्या नाहीत, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान येत्या तीन महिन्यांत संबंधितांना खुर्च्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांनी मच्छी मार्केटमध्येच बसावे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, अन्यथा कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे समितीच्या प्रमुख अनारोजीन लोबो यांनी सांगितले. मच्छी विक्रेत्यांनी स्वच्छता राखावी तसचे प्लास्टिकचा वापर टाळावा. असे न केल्यास पालिका संबंधितांवर दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा येथे बैठकीत मच्छी विक्रेत्यांना देण्यात आला.

यावेळी विक्रेत्यांनीही मागण्या पालिकेसमोर मांडल्या. शहरात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मच्छी विक्रेत्यांची पालिका सभागृहात बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, आंनद नेवगी, भरती मोरे , बांधकाम अभियंता तानाजी पालव, आसावरी केळबाईकर, परवीन शेख आणि मच्छी विक्रेते उपस्थित होते. 

मच्छी विक्रेत्यांना कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिक पिशव्या वापरता येणार नाहीत, असे पालिकेकडून सांगण्यात आले. ग्राहकांना कापडी, कागद पिशव्या किंवा डब्यातून मच्छी द्या, असा सल्ला अनारोजीन लोबो यांनी दिला. मार्केटमध्ये स्वच्छता राखावी, होलसेल विक्रेत्यांनी त्यांना दिलेल्या खोलीतच मच्छी विक्री करावी, असे यावेळी सांगण्यात आले. 

विक्रेत्यांच्या सोयीसाठी मार्केट मध्ये कॉल्ड स्टोरेज उपलब्ध करुन देऊ असे अभियंता पालव यांनी सांगितले; मात्र उपलब्ध करून देणारे स्टोरेज तळमजल्यावर असेल. त्यामुळे खाली जाऊन मच्छी आणणे गैरसोयीचे ठरेल आणि स्टोरेजचे शुल्क परवडणारे नाही, असे सांगत विक्रेत्यांनी याला विरोध करत स्टोरेज ऐवजी मार्केटमध्ये इन्व्हर्टर बसवण्याची मागणी केली. गाळ्याचे भाडे कमी करावे अशी मागणीही विक्रेत्यांनी केली; मात्र ते शक्‍य नसल्याने पालिकेकडून सांगण्यात आले. मार्केट बाहेर मच्छी विकणाऱ्यांवर कारवाई करावी, असे न झाल्यास आम्ही बाहेर बसून मच्छी विक्री करू असा इशारा काही विक्रेत्यांनी दिला. 

मच्छी विक्रेते उभे राहून आपला व्यवसाय करतात त्यांना बसण्यासाठी मार्केट मध्ये खुर्च्या उपलब्ध करून देऊ असे आश्वासन पालिकेने मार्केट सुरू होण्यापूर्वी दिले होते; मात्र दीड वर्ष पूर्ण झाली तर खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचे विक्रेत्यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून देत त्या खुर्चीचे काय झाले अशी विचारणा केली. यानंतर येत्या तीन महिन्यांत विक्रेत्यांना खुर्च्या उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले.

Web Title: Sindhudurg News problems in Fish Market