मोदी लाट आता ओसरली - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

कुडाळ - देशासह राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. हे सरकार 2014 पुरतेच मर्यादीत होते. आता 2019 मध्ये त्यांच्या हाती सत्ता नाही. राज्यात विकासासाठी प्रादेशिक पक्ष हवाच. राष्ट्रीय पक्षाला स्थान असता कामा नये, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली. 

कुडाळ - देशासह राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. हे सरकार 2014 पुरतेच मर्यादीत होते. आता 2019 मध्ये त्यांच्या हाती सत्ता नाही. राज्यात विकासासाठी प्रादेशिक पक्ष हवाच. राष्ट्रीय पक्षाला स्थान असता कामा नये, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली. 

श्री. ठाकरे संघटना बांधणीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आले होते. येथील हॉटेल लेमनग्रास येथे त्यांचे मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोषी स्वागत केले. यावेळी ते म्हणाले, ""ठाणे, रायगड नंतर हा माझा सिंधुदुर्ग दौरा आहे. फक्त संघटना बांधणीचा हा दौरा आहे. जाहीर मेळावा नाही. पक्षातील पदाधिकाऱ्यांना भेटणे हा हेतू आहे. अनेक ठिकाणी नवीन पदे नेमायची आहेत. अजून काही पदे निर्माण करायची आहेत.'' 

महामार्ग चौपदरीकरण पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, ""चौपदरीकरणासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. येथे होणाऱ्या कामाबाबत कोकणातील जनतेने आपला हिसका दाखविण्याची गरज असताना तीच माणसे त्यांना निवडून देतात, ही शोकांतीका आहे. 2014 ला झालेल्या विधानसभेपूर्वी मी राज्यात प्रादेशिक पक्ष हवा, राष्ट्रीय पक्षाला स्थान असता कामा नये, राष्ट्रीय पक्षाला येथील अस्मितेबद्दल जाण नसते, अशी भूमिका मांडली होती. नाणारमध्ये परप्रांतियांनी जमिनी घेतल्या. याठिकाणी प्रादेशिकपणा असता तर जमीनी घेण्याची कोणाची हिंमत होणार नसती.'' 

"राज्यात, देशात आता मोदींची लाट राहिलेली नाही. ती आता ओसरत चालली आहे. गुजरातमध्ये त्यांच्याच राज्यात त्यांना मिळालेल्या 99 जागा या ओसरतीच्या कळा आहेत. त्यामुळे आता 2019 मध्ये मोदी सरकारचे अस्तित्व असणार नाही.'' 

- राज ठाकरे

यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, बनी नाडकर्णी, प्रसाद गावडे, बाबल गावडे, दीपक गावडे, बाळा पावसकर, दिव्या गावडे, भाव्या विचारे, सचिन सराफदार, राजेश टंगसाळी, गुरू गवंडे, सिद्धेश कुणळे, चेतन राऊळ, प्रथमेश धुरी, सुप्रिया महेता पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजपचे वास्तव उघड झाले 
भाजपने 2014 च्या निवडणुकीत काय प्रताप केले, ते मतमोजणी यंत्रातून स्पष्ट झाले. बऱ्याच ठिकाणी शून्य मते मिळतात म्हणजे त्या उमेदवाराला स्वतःची घरातील मते नाहीत का असा सवाल करीत श्री. ठाकरे यांनी केला. 

Web Title: Sindhudurg News Raj Thakare comment