निवारा केंद्राची दुरूस्ती लगेच न केल्यास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सावंतवाडी - येथील महिला निवारा केंद्राच्या दुरूस्तीचे काम येत्या आठ दिवसात पुर्ण करुन रत्नागिरी येथे हलविलेला कारभार पुन्हा याठिकाणी आणा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आज येथील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केंद्राच्या प्रशासनाला दिला.

सावंतवाडी - येथील महिला निवारा केंद्राच्या दुरूस्तीचे काम येत्या आठ दिवसात पुर्ण करुन रत्नागिरी येथे हलविलेला कारभार पुन्हा याठिकाणी आणा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आज येथील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केंद्राच्या प्रशासनाला दिला.

यासाठी सहा लाखाचा निधी मंजूर आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन गेल्या आठ महिन्यात कामच करण्यात न आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे, असे केंद्राच्या अधिक्षिका रेश्‍मा पठाण यांनी सांगितले. त्यामुळे उद्या (ता.18) पुन्हा बांधकामला घेराव घालण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांकडुन देण्यात आला आहे.

येथील अंकुर महिला केंद्राची इमारतीवर झाड पडल्याने ही इमारत कोसळली होती. हा प्रकार मागच्या पावसाळ्यात घडला होता. त्यानंतर येथील सर्व कार्यभार रत्नागिरी येथे हलविण्यात आला होता.

दुरूस्तीच्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून आठ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन देण्यात आला होता; मात्र आज पर्यंत हे काम झाले नाही. परिणामी चार कर्मचारी याठिकाणी असेच बसून आहेत. बाकीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना रत्नागिरीत पाठविण्यात आले आहे. याबाबत सकाळने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल शिवसेनेच्या महीला पदाधिकाऱ्यांनी घेतली. आज नगरसेविका अनारोजीन लोबो यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी केंद्राच्या अधिकारी पठाण यांना जाब विचारला. यावेळी नगरसेविका भारती मोरे, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, कमला मेमन, निता सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केंद्राच्या प्रशासनाला इशारा दिला आहे. यात सावंतवाडीत महिला केंद्र असताना त्याठिकाणी येणाऱ्या महिला तसेच लहान बालकांना रत्नागिरी किंवा कोल्हापूरात न्यावे लागत आहे ही आमच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही व्हावी आणि रत्नागिरीत हलविण्यात आलेले केंद्र याठिकाणी तात्काळ आणावे, त्यासाठी रखडलेले दुरुस्तीचे काम येत्या आठ दिवसात पुर्ण करण्यात यावे, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

अधिक्षीका पठाण यांनी हे काम बांधकामच्या अधिकाऱ्यांकडुन होणे गरजेचे आहे. तसा त्यांनी पत्रव्यवहार केला आहे; मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही; परंतु काम पुर्ण झाल्यानंतर आम्ही तात्काळ याठिकाणी केंद्र हलविणार आहोत, असे पठाण यांनी सांगितले.

या वेळकाढू धोरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना जाब विचारणार आहोत, काही झाले तरी गप्प बसणार नाही. प्रसंगी आमची आंदोलनाची तयारी आहे, असा इशारा लोबो यांनी दिला.

Web Title: Sindhudurg News Repair of Shelter Center issue