वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा सावंतवाडी पालिकेत ठराव

सावंतवाडी - येथे पालिकेच्या सभेत वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा ठराव मांडतांना नगराध्यक्ष बबन साळगावकर.
सावंतवाडी - येथे पालिकेच्या सभेत वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा ठराव मांडतांना नगराध्यक्ष बबन साळगावकर.

सावंतवाडी - जिल्ह्यासाठी शासकीय वैदयकीय महाविद्यालय जाहीर करण्यात यावे. दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेगुर्ले या भागातील लोकांना त्याचा फायदा व्हावा. यासाठी ते सावंतवाडीत उभारण्यात यावे, असा ठराव आज येथे आयोजित पालिकेच्या मासिक सभेत करण्यात आला. याबाबतचा ठराव नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडला विशेष म्हणजे सर्व सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. या ठरावामुळे सकाळने याआधी मांडलेल्या भूमिकेला बळकटी मिळाली आहे.

येथील पालिकेची आज मासिक सभा झाली. यावेळी हा ठराव घेण्यात आला. याबाबतची माहिती श्री. साळगावकर यांनी पत्रकार परिषद घेवून दिली. ते म्हणाले, " गोवा बांबुळीत उपचार बंद करण्यात आल्याने हा प्रश्‍न आता कळीचा बनला आहे. गोवा बांबुळीत उपचार पुन्हा निशुल्क सुरू करण्यात यावेत, ही मागणी योग्य आहे; परंतु आम्ही आता किती दिवस अन्य राज्यावर अवलंबून रहावे हा सुध्दा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे शासनाकडुन मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलसाठी जाहीर करण्यात आलेले वीस कोटी रुपयाचा निधी लक्षात घेता आणखी दहा कोटी रुपये वाढवून देण्यात यावेत आणि सावंतवाडीत नव्याने पाचशे बेड क्षमता आणि शंभर विद्यार्थी क्षमता असलेले वैदयकीय महाविद्यालय सुरु करावे. तात्पुरत्या स्वरुपात येथील कुटीर रुग्णालयाला मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलचा दर्जा देण्यात यावा.''

सकाळ च्या भूमिकेला बळकटी
जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय सुरु झाल्यास येथील आरोग्यविषयी बरेचसे प्रश्‍न आपोआप सुटतील अशी भूमिका सकाळने याआधी मांडली आहे. त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन कृती समितीही स्थापना केली. येथील पालिकेने आज घेतलेल्या ठरावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा पहिला ठराव झाला. या आधी दोडामार्गमधील आंदोलकांशी चर्चा करतांना मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनानंतर शासकीय महाविद्यालयाबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे.

श्री. साळगावकर म्हणाले, ""त्याचा फायदा सावंतवाडीसह वेगुर्ले आणि दोडामार्ग भागातील लोकांना होणार आहे. चांगले उपचार त्यांना निश्‍चीतच मिळू शकतात. त्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती लक्षात घेता तात्काळ याला परवागनी मिळेल असे वाटत नाही. त्यासाठी पन्नास एकर जागेची गरज आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात सावंतवाडीत रुग्णालयाला हा दर्जा देण्यात यावा.'' 

श्री साळगावकर पुढे म्हणाले, "" शासकीय वैदयकीय महाविद्यालय या ठिकाणी होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. कणकवली, कुडाळ, मालवण या भागासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मेडीकल कॉलेज आहे. त्यामुळे तेथील रुग्णांना याचा फायदा होणार आहे; मात्र या तीन तालुक्‍यातील रुग्णांना एकाच छताखाली सर्व तज्ञ डॉक्‍टर, ट्रामाकेअर सेंटर आदी विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यानच्या काळात या ठिकाणी मेडीकल कॉलेज उभारण्यात यावे यासाठी आवश्‍यक असलेले ठराव तीनही तालुक्‍यातील ग्रामपंचायतींनी व पंचायत समिती स्तरावर घेण्यात यावेत. हे ठराव आम्ही शासनस्तरावर पाठवू.''

दोन मजली अनधिकृत कॉम्प्लेक्‍स
यावेळी श्री साळगावकर म्हणाले, ""शहरात एका बिल्डरकडुन पालिकेची कोणतीही परवानगी न घेता सालईवाडा भागात चुकीच्या पध्दतीने दोन मजली कॉम्प्लेक्‍स उभारण्यात आले आहे. याबाबत पालिकेकडुन त्या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यात फ्लॅट खरेदी करणाऱ्या लोकांनी याची नोंद घ्यावी. 

मी सामान्यांचा
जनआक्रोश आंदोलनादरम्यान श्री. साळगावकर यांच्यावर टिका झाली होती. याला त्यांनी उत्तर दिले. मी सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे कोठे अन्याय झाला तर मला रस्त्यावर उतरण्यास कमीपणा वाटत नाही लोकांनी दिलेली जबाबदारी मी पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनात सहभागी झालो. त्यामुळे कोणी टिका करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com