मालवणात बीएसएनएलविरुद्ध शिवसेना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मालवण - शहरासह तालुक्‍यात बीएसएनएलच्या सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. कसबे यांना घेराओ घातला. बीएसएनएलचा कारभार असाच सुरू राहिल्यास बीएसएनएलच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला.

मालवण - शहरासह तालुक्‍यात बीएसएनएलच्या सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. कसबे यांना घेराओ घातला. बीएसएनएलचा कारभार असाच सुरू राहिल्यास बीएसएनएलच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला.

बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. भिसे हे उद्या येथे येऊन या समस्येवर तोडगा काढणार असल्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना या वेळी दिले. 

गेले दोन महिने शहरासह तालुक्‍यातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. याप्रश्‍नी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही अद्यापपर्यंत त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे संतप्त बनलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज येथील दूरसंचारच्या कार्यालयात जात अधिकाऱ्यांना घेराओ घातला. या वेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक नितीन वाळके, पंकज सादये, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, बाबी जोगी, किरण वाळके, महेंद्र म्हाडगुत, अंजना सामंत, बाबू मांजरेकर, दीपा शिंदे, यशवंत गावकर, किशोर गावकर, दीपक मयेकर, तुळशीदास मयेकर, तपस्वी मयेकर आदी उपस्थित होते. 

या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहरात सुरू असलेल्या बीएसएनएलच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचला. कॉल ड्रॉपच्या समस्येने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. थ्रीजी नेटवर्क नसल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांचेही हाल होत आहेत. अन्य मोबाईल कंपन्यांचे कॉल व्यवस्थित सुरू असून बीएसएनलच्या बाबतीत कोणती समस्या निर्माण झाली आहे. असा प्रश्‍न शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासमोर बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु अद्यापही बीएसएनएलच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. याचा अर्थ बीएसएनएलचे अधिकारी आमदार, खासदारांनाही दाद देत नसल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नितीन वाळके, दीपक मयेकर, महेंद्र म्हाडगुत यांनीही समस्या मांडल्या.

या वेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जिओ मोबाईलची सेवा सुरळीत सुरू आहे; परंतु बीएसएनएलची सेवा कोलमडली आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात ॲप डाऊनलोड करणे महत्त्वाचे आहे; परंतु बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे ॲप डाऊनलोड होत नाहीत. त्यामुळे लोकांना दुसऱ्या कंपनीची कार्ड खरेदी करण्याची वेळ आली आहे. या सर्वांचा फटका पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात बसणार आहे, असे सांगितले.

बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. कसबे यांनी दूरध्वनीद्वारे एस. आर. भिसे यांच्याशी संपर्क साधला. भिसे यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना उद्या मालवणात येऊन बीएसएनलची निर्माण झालेली समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.

Web Title: Sindhudurg News Shivsana agitation against BSNL in Malvan