किनाऱ्यावर वादळवारे

किनाऱ्यावर वादळवारे

देवगड / वैभववाडी - ‘ओखी’नंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किनारपट्टी वादळाच्या छायेत आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत आज पावसाचा शिडकावा झाला. आखवणे, मौदे या वैभववाडी तालुक्‍यातील गावांमध्ये वादळाचा तडाखा बसला.

कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने उत्तरेकडे सरकत असल्यामुळे वादळाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस, प्रशासनासह मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षितता म्हणून विजयदुर्ग बंदरात तामिळनाडूचे तीन, तर देवगड बंदरात गुजरातमधील एक ट्रॉलर आश्रयाला आला आहे. धान्य संपल्याने केरळच्या एका ट्रॉलरवरील खलाशी बंदरात दाखल झाले आहेत. पोलिस, मत्स्यव्यवसाय विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अलीकडे डिसेंबरमध्ये कोकण किनारपट्टीवर समुद्रात ‘ओखी’ वादळ झाल्याने सर्वार्थाने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येथील बंदरात राज्याच्या विविध भागांबरोबरच परराज्यांतील केरळ, तामिळनाडू, गोवा तसेच गुजरात येथील शेकडो नौका आश्रयाला आल्या होत्या. राज्य शासनाकडून त्यांच्यासाठी येथे सर्व सोयी पुरवण्यात आल्या होत्या. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो येत्या २४ तासांत तीव्रतेने उत्तरेकडे सरकत आहे. या कालावधीत जोरदार वाऱ्यासह समुद्र खवळलेला राहणार आहे. याचे पडसाद आजपासूनच येथे जाणवू लागले आहेत. आज सकाळपासूनच येथील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढला होता. किनारपट्टी धुरकट बनली होती.

पावसाळी वातावरण तयार होऊन हवेतील तापमानात वाढ झाली होती. समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसू लागल्याने मच्छीमारांनी सावधगिरी बाळगण्यास सुरवात केली. संभाव्य वादळाच्या पार्श्‍वभूमीवर विजयदुर्ग बंदरात तमिळनाडू येथील तीन मच्छीमारी ट्रॉलर आश्रयाला दाखल झाले आहेत. त्यांची विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी पाहणी केली. तेथील प्रत्येक ट्रॉलरवर १२ याप्रमाणे ३६ मच्छीमार बंदरात आहेत.

येथील बंदरात गुजरातमधील एक ट्रॉलर आश्रयाला आले आहे. तसेच केरळमधील एक ट्रॉलर समुद्रात असून धान्य संपल्याने त्यावरील काही मच्छीमार छोट्या नौकेवरून बंदरात आले आहेत. त्यांच्याशी पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. शिवगण, सागरी पोलिस उपनिरीक्षक व्ही. आर. कराळे, परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी संवाद साधला. यावेळी पोलिस नाईक राजन पाटील, पोलिस नाईक गुरुप्रसाद परब उपस्थित होते. समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस व प्रशासनाला सतर्कता बाळगण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. सायंकाळी पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाले होते.

दरम्यान वैभववाडी तालुक्‍यातील भुईबावडा परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तासभर झालेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. घाट परिसरातदेखील पाऊस झाला. वैभववाडी शहरासह अन्य भागातदेखील पाऊस झाला. या पावसामुळे काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे; तर उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील इतर भागातही पावसाचा शिडकावा झाला.

येथील वातावरणामध्ये आज सकाळपासून प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. याशिवाय वारादेखील सुटला. सायंकाळी पाच वाजल्यापासून भुईबावडा आणि करूळ घाट परिसरात विजांचा कडकडाट सुरू झाला. या भागात सुरवातीला रिमझिम पाऊस सुरू होता; मात्र त्यानंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली. भुईबावडा परिसराला पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह तब्बल तासभर पाऊस सुरू होता.

ऐन उन्हाळ्यात शेतीचे मळे पावसाच्या पाण्याने भरले. पावसामुळे त्या भागातील लोकांची एकच तारांबळ उडाली. ऐनारी, हेत, मांगवली, उंबर्डे, कुसुर या भागातही पाऊस झाला. सहा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी परिसरात पावसाला सुरवात झाली. वैभववाडी, कोकिसरे, करूळ, कुंभवडे, नापणे, खांबाळे परिसरात पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. आखवणे आणि मौदे या गावांमध्ये सायंकाळी उशिरा वादळाचा तडाखा बसला. येथे काही ठिकाणी झाडे पडल्याचाही प्रकार घडला.

गेल्या आठवड्यापासूनच काजूचा हंगाम सुरू झाला होता. पावसामुळे काजू आणि आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. भुईबावडा परिसरातील काजू बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचेदेखील नुकसान झाले आहे. या पावसामुळे बांधकाम सुरू असलेल्या लोकांची धांदल उडाली. याशिवाय आवराआवर करताना बांधकाम व्यवसायिकांचीदेखील पळापळ झाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मांगवलीत वीज कोसळली
भुईबावडा परिसरात गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाचा फटका काही प्रमाणात मांगवलीला बसला. मांगवली, नरसाळेवाडी येथील विजय राणे यांच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाडाच्या शेंड्यात काही काळ आग पेटत होती. तेथे चहुबाजूंनी घरे आहेत; परंतु सुदैवाने मोठी जीवित व वित्तहानी टळली; तर लोकमवाडी येथे काही घरांवरील सिमेंट पत्रे व कौले उडाल्याने नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com