सिंधुदुर्गात ऊस उत्पादकांना अच्छे दिनचे संकेत

सिंधुदुर्गात ऊस उत्पादकांना अच्छे दिनचे संकेत

वैभववाडी - जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढीबरोबरच आता त्याच्या खरेदीसाठीही स्पर्धा होऊ लागली आहे. रिलायबल शुगर फराळे हा कारखाना नव्याने येथे जास्त प्रमाणात ऊस खरेदीसाठी प्रयत्न करू लागल्याने हळूहळू उसामधील मक्तेदारी मोडीत निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्ह्यात ऊसतोड करण्यासाठी रिलायबल शुगर फराळे या साखर कारखान्याने सुरवात केली आहे. त्यामुळे ऊस तोडीकरिता एकाच कारखान्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यातच ऊस खरेदीकरिता दोन कारखान्यांमध्ये निर्माण झालेली स्पर्धा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढत आहे. विशेषतः डी. वाय. पाटील साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वैभववाडी, कणकवली या दोन तालुक्‍यांसह राजापूर तालुक्‍यात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला या तीनही तालुक्‍यांतून सुमारे एक लाख टन ऊस जातो; परंतु सुरवातीपासून आतापर्यंत येथील शेतकऱ्यांना ऊसतोडीच्या समस्येने ग्रासले आहे.

एकच कारखाना ऊस खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच कारखान्याच्या टोळ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे ऊसतोडीच्या पाळीपत्रकावरून तालुक्‍यात मोठे वाद निर्माण झाले होते. अनेकदा रास्ता रोको करून गट कार्यालयांना टाळे ठोकले होते. त्यातच टोळ्यांकडून एन्ट्रीच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात असल्याने शेतकरी हतबल असे. पर्याय नसल्यामुळे टोळीप्रमुख म्हणेल तीच रक्कम शेतकऱ्याला द्यावी लागे. काहीही करा; परंतु ऊसतोड करा, अशी अवस्था शेतकऱ्यांची व्हायची; मात्र अशा शेतकऱ्यांना आता ऊसतोडीकरिता आणखी एक पर्याय कणकवली, वैभववाडीत उपलब्ध झाला आहे.

राधानगरी फराळे येथील रिलायबल शुगर साखर कारखान्याने गेल्यावर्षी या दोन्ही तालुक्‍यांत ऊस खरेदी केला. सुमारे वीस हजार टन ऊस या कारखान्याने खरेदी केला. अन्य कारखान्यांच्या बरोबरीत दर दिला. याशिवाय ऊसटोळ्या वेळेत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पर्यायी कारखान्यांकडील कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

यावर्षीही येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आपल्या कारखान्यांच्या वतीने शेतकऱ्यांना कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत  याची इंत्यभुत माहीती देतानाच शेतकऱ्यांना बॅकेकडुन सुलभ पद्धतीने पतपुरवठा होण्याच्या दृष्टीने कारखाना हमीपत्र देणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे रिलायबल शुगर कारखान्याने अप्रत्यक्ष तोडीचा प्रारंभ केला आणि डी. वाय. पाटील कारखान्याशी स्पर्धा करण्यास सज्ज असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांमध्ये यापुढील काळात ऊसतोडीची मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या स्पर्धेचा फायदा आपसुकच येथील ऊस शेतकऱ्यांना होणार आहे. लवकर ऊसतोड होण्याकरीता करावी लागणारी शेतकऱ्यांची धडपड आता थांबण्याची शक्‍यता आहे.

गेल्या पंधरा वर्षात वैभववाडी, कणकवली आणि राजापूर या तीन तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली. सुरूवातीला तीनही तालुक्‍यातुन दहा हजार टन ऊस कारखान्याला जात होता; परंतु यावर्षी सव्वा लाख टनाचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या वाढत्या ऊस क्षेत्राबरोबरच साखर कारखानेही ऊस खरेदीच्या स्पर्धेत येऊ लागले आहेत. कारखान्यांमधील स्पर्धेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

कारखान्यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणे, उत्पादकता वाढविण्यासाठी मार्गदर्शन मेळावे घेणे, अद्यावत तंत्रज्ञानाचा ऊसशेतीत वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याची नैतिक जबाबदारी कारखान्यांची आहे; परंतु तशा पध्दतीचे कोणतेच पाऊल काही अपवाद वगळता कारखान्यांकडुन उचलले जात नाहीत; परंतु अन्य कारखाने ऊसखरेदीच्या स्पर्धेत आल्यामुळे भविष्यात कारखान्यांकडुन शेतकरी हिताच्या विविध योजना राबविण्याची शक्‍यता आहे.

वशिलेबाजीला चाप...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या यादीत बड्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. अनेकदा पाळी पत्रकाला तिलांजली देत या बड्या पदाधिकाऱ्यांचा ऊस तोडला जातो. त्यामुळे कित्येकदा वाद झाल्याची उदाहरणे आहेत; परंतु कारखान्यांमधील स्पर्धेमुळे भविष्यात काही अंशी वशिलेबाजीला चाप बसण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com