कणकवलीत स्वच्छता ॲपवर तक्रारींचा ढिगारा

कणकवलीत स्वच्छता ॲपवर तक्रारींचा ढिगारा

कणकवली - अस्वच्छतेच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ‘स्वच्छता ॲप’ कार्यान्वित झाले आहे; तर नागरिकांकडूनही आपले शहर निवडून, आपल्या परिसरातील अस्वच्छतेच्या तक्रारी केल्या जात आहेत. यातील काही तक्रारींचा नगरपंचायतीकडून निपटारा केला जातोय. मात्र, अस्वच्छतेबाबतच्या काही समस्या मात्र ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.

नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल नगरपंचायतीकडून घेतली जात आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आपल्या मोबाईलवर स्वच्छता ॲप डाउनलोड करून, आपल्या परिसरातील अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

स्वच्छ भारत अभियान सर्व शासकीय विभागांकडून अगदी जोर लावून राबविण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने नागरिक राहत असलेला परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हे जितके खरे आहे, तितकीच आव्हानाची बाब म्हणजे एका बाजूला शहराचा विस्तार वाढत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला स्वच्छतेचा प्रश्‍नही वाढत आहे. याचा खरा ताण स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे.

शहरात कोणत्या भागात व कोणत्या परिसरात कचरा किंवा अस्वच्छता आहे, याची माहिती सहजासहजी नगरपंचायत किंवा पालिकांना मिळत नाही; तर पालिकेत जाऊन तक्रार करणे हे नागरिकांसाठी सोपे नाही. यामुळे स्वच्छता ॲपच्या माध्यमातून शहरातील कचरा साफ करण्यास सोपे बनले आहे. 

कणकवली शहरातील अनेक नागरिकांनी स्वच्छता ॲप मोबाईलमध्ये घेतले आहे. हा अनोखा उपक्रम नागरिकांच्या नेटकरींसाठी पसंतीचा ठरत आहे. घरबसल्या अनेकदा येता-जाता ज्याठिकाणी अस्वच्छता दिसत आहे, त्याठिकाणचे छायाचित्र काढून व ते ठिकाण कोणते आहे, याची माहिती त्या ॲपमध्ये डाउनलोड करण्याची व्यवस्था आहे. तक्रार नोंद झाल्यानंतर पुढील दोन ते चार तासांत नगरपंचायतीकडून तक्रार आलेल्या भागातील कचरा स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे. मात्र, शहरातील काही भागातील तुंबलेली ड्रेनेज व्यवस्था, फुटलेल्या कचराकुंड्या यामुळे अनेक भागांतील समस्या ‘जैसे थे’ राहिल्या आहेत.

कणकवली शहरात सांडपाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटार योजना कार्यान्वित नाही. त्यामुळे पावसाळा संपताच शहरातील अनेक भागांतील नागरिक त्यांच्या मालकीच्या जमिनीतून जाणारी सांडपाण्याची गटारे बंद करतात. या समस्येवर सत्ताधाऱ्यांना अद्याप मार्ग काढता आलेला नाही. त्यामुळे ॲपवर तक्रारी नोंदवूनही सांडपाण्याची समस्या तशीच राहिली आहे.

शहरातील शिवाजीनगर, नाथ पैनगर, परबवाडी या भागातील कचराकुंड्या फुटल्या आहेत. त्यात कचरा टाकल्यानंतर मोकाट जनावरे हा कचरा रस्त्यावर आणतात. त्यामुळे स्वच्छ, सुंदर कणकवली शहराचे चित्र बकाल होत आहे. याबाबतही नागरिकांकडून तक्रारी नोंदविल्या जात आहेत. मात्र, कचराकुंड्या बदलल्या जात नसल्याने या भागातील कचऱ्याची समस्याही कायम राहिली आहे.

केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याने विकसित केलेला हा ‘स्वच्छता ॲप’ आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर क्‍लिक करून डाउनलोड करून घेता येणार आहे. यासाठी प्ले स्टोअरवर Swachhata-MoHUA हे सर्च केल्यावर हा ॲप उपलब्ध होणार आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर भाषा निवडावी लागणार आहे. नंतर हा अप मोबाईल नंबर मागणार आहे. तो नमूद केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येणार आहे. 

तक्रार निवारणानंतर जागेच्या फोटोसह ‘रिप्लाय’
आता आपली तक्रार नगरपंचायतीच्या कार्यालयाकडे तत्काळ पोचणार आहे. ती संबंधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाऱ्याकडे तत्काळ पाठविण्यात येईल. त्या तक्रारीचे निवारण करून तक्रार असलेल्या जागेचे तक्रार निवारणानंतरचे छायाचित्र संबंधित पालिकेचा अधिकारी काढून त्या साईटला पोस्ट करणार आहे. एवढेच नव्हे, तर छायाचित्र संबंधित नागरिकाला तत्काळ दिसणार आहे. त्यामुळे केलेल्या तक्रारींचे निराकरण झाल्याचे समाधानही तक्रारकर्त्याला मिळणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.

लोकेशन व लॅन्डमार्क केल्यावर तक्रार थेट पालिकेकडे
या प्रोसेसनंतर पोस्ट युवर फर्स्ट कम्प्लेंट (पहिली तक्रार पोस्ट करा)वर क्‍लिक करावे लागणार आहे. त्यानंतर स्वच्छतेबाबत जी तक्रार नोंदवायची आहे, त्या जागेचे छायाचित्र मोबाईलवर काढून तक्रारींचा पर्याय निवडायचा आहे. यात तुम्हास सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या तक्रारी यात मृत प्राणी आहे, कचऱ्याचा ढीग आहे, कचरा गाडी आली नाही यापैकी जी तक्रार लागू असेल, त्यावर क्‍लिक करायचे आहे. त्यानंतर त्या परिसराचे लोकेशन व लॅन्डमार्क (स्थळ व लगतची ठळक खूण) टाइप करायचे आहे. हे झाल्यावर स्क्रीनवर खालीच पोस्ट करा, असे शब्द दिसतील. त्यावर क्‍लिक केल्यावर आपली तक्रार पोचल्याचा संदेश मिळणार आहे.

शहरांसाठी विशेष गुण
या सर्वेक्षणात संबंधित ॲपचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या शहरांसाठी विशेष गुण राखून ठेवले आहेत. कणकवली नगरपंचायतीतर्फेही हा उपक्रम शहरात राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले असून, त्याची सुरवातही तातडीने करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com