भातकापणी काळातच तापसरीचे लोण

भूषण आरोसकर
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - शेतीसाठी राबराब राबावे आणि शेती करून मरावे..अशी केविलवाणी अवस्था आज बळीराजाची झाली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तापसरीने बळी गेलेले रुग्ण हे शेती व्यावसायाशी संबधित होते. त्यामुळे कष्टाच्या मोबदल्यात प्राणाची आहूती अजून किती जणांनी द्यावी? असा सवाल आज प्रत्येक शेतकरीवर्गाकडून प्रशासन व कुचकामी आरोग्य यंत्रणेस विचारला जात आहे.

सावंतवाडी - शेतीसाठी राबराब राबावे आणि शेती करून मरावे..अशी केविलवाणी अवस्था आज बळीराजाची झाली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तापसरीने बळी गेलेले रुग्ण हे शेती व्यावसायाशी संबधित होते. त्यामुळे कष्टाच्या मोबदल्यात प्राणाची आहूती अजून किती जणांनी द्यावी? असा सवाल आज प्रत्येक शेतकरीवर्गाकडून प्रशासन व कुचकामी आरोग्य यंत्रणेस विचारला जात आहे.

ऐरवी भातशेतीच्या नुकसानीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यापुढे शेतात राबत असतानाच आजारी पडून अखेर मृत्यूच्या दाढेत जाण्याची वेळ गेल्या काही वर्षांपासून येत आहे. विशेषतः लेप्टो स्पायरोसीस हा ताप भात कापणीच्या काळातच फोफावतो. वन्य जीवांच्या मलमुत्रातून पसरणाऱ्या या आजाराचे प्रसारस्थान शेतीच असते. लेप्टोचा यावर्षीचा पहिली रुग्ण दगावला आहे. यामुळे पुन्हा एकदा धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या पंधरावड्यात तापाने मृत्यू झालेल्या सहापैकी बहुसंख्य शेतीशी संबंधित आहेत.

शेतीची कामे करताना स्वतःकडे लक्ष द्यावे की शेती कामाकडे यासाठीही पुरेसा वेळ देता येत नसलेल्या शेतकऱ्याला ग्रामीण रुग्णालयाची पायरी चढायला तरी वेळ मिळेल काय? असा सवालही आजचा गरीब शेतकरी विचारीत आहे. पै पै मिळविण्यासाठी शेती करायची आणि साधा ताप अंगावर काढून जबरदस्ती केल्यावर वेळात वेळ काढून प्राथमिक रुग्णालयाची पायरी चढायची. चांगल्या सोयीचे उपचार हे फक्त खाजगी रुग्णालयाच मिळतील मात्र सर्वसामान्याच्या खिशाला चाट असतानाच तिकडे वळणार कोण? त्यापेक्षा साधे उपचारच बरे म्हणून साधी उपचार व प्राथमिक रुग्णालयाची औषधे घेण्यावरच हा शेतकरी मोठे समाधान व्यक्त करतो. जिल्ह्यात तापसरीच्या दगावत असलेल्या रुग्णामुळे जिल्हावासियांत मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत कुचकामी ठरत असलेली आरोग्य यंत्रणा व शासनावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात तापसरीचे सहा बळी गेल्यानंतर आता अजून किती बळी घेतले जाणार हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात तापसरीने अलिकडच्या काळात थैमान घातले आहे. अचानकपणे रुग्ण दगावत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एकामागुन एक दगावत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याला पुर्णपणे शासन व प्रशासकिय यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलण्यात येत आहे. वेळेत उपचार मिळाल्यास आज सर्वाचे प्राण वाचविण्यात येणार होते. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा मात्र व्हेंटीलेटरवर आहे. दगावलेल्या पाच पैकी चार जणांचा शेती व्यवसायाशी संबंधित होते. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतातील उंदीर घूशीचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या मलमुत्रामुळे लेप्टोसारखी तापसरीने डोके वर काढले आहे. त्यातच शेतात पाणी साचून राहिल्यामुळे निमोनिया, डेग्यू, टायफाईड यासारख्या तापसरीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना होत आहे.

शेती काम करण्याची भितीच...
प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना लवकरच या आजाराची लागण होत आहे. दरम्यान तापसरीवर आरोग्य यंत्रणेकडून सर्व्हेक्षण व माहिती देण्याची प्रक्रिया चालूू असली तरी माहिती घेण्यासाठी शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे घरी थांबायला तरी वेळ कुठे आहे. जिल्ह्यात पून्हा एकदा काल लेप्टो तापसरीने कणकवली तालुक्‍यात रमेश जाधव यांचा बळी गेला. दिवसेदिवस हे असेच चालू राहिले तर शेती करायला आपली भावी पिढी धजावणार तर नाहीच शिवाय आताही कुटुंबियांना शेती कामात लावायलाही भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे.