सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारू - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

वेंगुर्लेतील सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी महायुद्धात चीन येथे जाऊन तेथील रुग्णांना सेवा दिली; पण आज त्यांच्याच गावातील जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

-  उद्धव ठाकरे

वेंगुर्ले - सिंधुदुर्गात शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे. अद्ययावत लॅब आणि सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलही येथे गरजेचे आहे. आम्ही ते करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

सिंधुदुर्गातील वैद्यकीय गैरसोयी लक्षात घेता येथे एकाच छत्राखाली सर्वसुविधा आवश्‍यक आहेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये हा उपाय आहे. अशी संकल्पना ‘सकाळ’च्या माध्यमातून मांडण्यात आली होती. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती स्थापन झाली. त्यांनी जागृती सुरू केली आहे. येथे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालय संकल्पनेची दखल घेत जाहीर कार्यक्रमात शासकीय महाविद्यालयासाठी शिवसेना ताकद लावणार असल्याचे संकेत दिले.

कोकणात राख, गुजरातमध्ये रांगोळी
रिफायनरीचा विषय सध्या कोकणात गाजतोय. अणूऊर्जा रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प कोकणच्या माथी मारायचे आणि चांगले चांगले प्रकल्प गुजरातला न्यायचे. कोकणात राख व गुजरामध्ये रांगोळी असा प्रकार सध्या मोदी सरकारकडून चालू आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात आज माकडतापाचे रुग्ण सापडत आहेत; मात्र माकडतापाचे निदान करणारी लॅब कोकणात नाही. कोकणात साखर सम्राट, शिक्षण सम्राट बरेच झालेत. आता सम्राट नको. येथे शासनाचे मेडिकल कॉलेज झाले पाहिजे. अद्ययावत लॅब झाली पाहिजे आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल झाले पाहिजे आणि हे सर्व आम्ही करु. शिवसेना कोकणचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही.’’

ठाकरे म्हणाले, ‘‘आज एका चांगल्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले. भविष्यात शिवसेनेचीच राज्यात सत्ता येणार असून येथे सुपर स्पेशालिटी मल्‍टि हॉस्पिटल, अद्ययावत लॅब सुविधा व शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करू. मला कोकणात नेहमी यावेसे वाटते. महाराष्ट्र माझा आहे; पण कोकणात भावनिक ओलावा आहे. वेंगुर्लेतील सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी महायुद्धात चीन येथे जाऊन तेथील रुग्णांना सेवा दिली; पण आज त्यांच्याच गावातील जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या राज्यात जावे लागते ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या शेजारच्या गोवा राज्यात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा आपल्या जिल्ह्यात का नाही? त्या मिळाल्या पाहिजेत. शासन आज चांगले प्रकल्प कोकणात आणत नाही.’’

तीन वर्षापूर्वी वेंगुर्लेतील नागरिकांना दिलेला शब्द आरोग्यमंत्री दीपक सावंत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज पूर्ण झाला असे या वेळी खासदार विनायक राऊत यांनी सांगून या नियोजित रुग्णालयासाठी मंजूर असलेले दोन पैकी एक डॉक्‍टर हजर झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या जिल्हा उपरुग्णालयाच्या बाजूलाच द्वारकानाथ कोटणीस यांच्या नावाने एक आयुर्वेदिक केंद्र सुरु करण्यात येईल, असे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार वैभव नाईक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, पंचायत समिती सभापती यशवंत परब, उपसभापती अस्मिता राऊळ, सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, तालुकाप्रमुख बाळा दळवी, अरुण दुधवडकर, नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, शहरप्रमुख विवेकानंद आरोलकर, जिल्हा शल्यचिकित्सक ए. व्ही. कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर आदी उपस्थित होते.

उपजिल्हा रुग्णालयासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या सचिन वालावलकर यांचा यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रारंभी ढोलताशांच्या गजरात ठाकरे यांचे सुहासिनींतर्फे त्यांचे औक्षण करण्यात आले. ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. ठाकरे यांनी वेंगुर्ले पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडला भेट देऊन पहाणी केली.

यावेळी मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या सहसचिव रंजना नेवाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क संघटक अर्चना नाईक, देवगड संपर्क संघटक भाग्यश्री दळवी, वसई संपर्क संघटक भारती गांवकर, सुभाष मयेकर, पंकज शिरसाट, ॲड जी. जी. टांककर, बाळा नाईक, सुरेश भोसले, हेमंत मलबारी, पंचायत समिती सदस्य अनुश्री कांबळी, सुनिल मोरजकर, रमण वायंगणकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी केले. 

Web Title: Sindhudurg News Uddhav Thakare Comment