मालवणात अनधिकृत स्टॉल हटविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मालवण - येथील बंदर जेटीवरील अनधिकृत स्टॉल हटविण्याची कारवाई आज मेरीटाईम बोर्डाच्या वतीने सुरू झाली. यात जेटी परिसरात व्यावसायिकांनी उभे केलेले अनेक स्टॉल हटविण्यात आले. अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे व्यावसायिकांची एकच धांदल उडाली.​

मालवण - येथील बंदर जेटीवरील अनधिकृत स्टॉल हटविण्याची कारवाई आज मेरीटाईम बोर्डाच्या वतीने सुरू झाली. यात जेटी परिसरात व्यावसायिकांनी उभे केलेले अनेक स्टॉल हटविण्यात आले. अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे व्यावसायिकांची एकच धांदल उडाली. संबंधित व्यावसायिकांनी अधिकृत स्टॉल लावण्यासाठी आवश्‍यक परवानगी घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर बंदर विभागाने दोन तासांनंतर कारवाईची मोहीम थांबविली. 

दरम्यान, होडी व्यावसायिकांकडे सर्व्हेची पावती नसल्याने बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवासी वाहतूक रोखली. त्यामुळे याचा फटका किल्ला दर्शनासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांना बसला. बंदरजेटी येथील बंदर विभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेवर अनेक पर्यटन व्यावसायिकांनी अनधिकृतरीत्या स्टॉल उभारले होते. यात काहींनी तर काँक्रीट टाकून त्यावर लोखंडी पाईप टाकून स्टॉल उभारण्याचे काम सुरू केले होते. याची माहिती मिळताच बंदर विभागाच्या वतीने आज सकाळपासून अनधिकृत स्टॉल हटविण्याच्या मोहीम राबविली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी संबंधित स्टॉलधारकांनी प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो यांची भेट घेत अधिकृत परवानगी घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार तोपणो यांनी ही मागणी मान्य करत अनधिकृत स्टॉल हटविण्याची मोहीम थांबविली. बंदर जेटी परिसरात करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी बंदर विभागाने आठ दिवसांची मुदत दिली आहे. अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही स्टॉल उभारता येणार नसल्याचेही बंदर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. आठ दिवसांत अतिक्रमणे न हटविल्यास बंदर विभागाच्या वतीने सर्व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर निरीक्षक शेखर वेंगुर्लेकर, अमोल ताम्हणकर, सुषमा कुमठेकर, अनंत गोसावी, आर. जे. पाटील, विश्राम घाडी, तुळाजी मस्के, साहेबराव आवळे, बंदर विभागातील कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. बंदर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम केलेल्या तीन स्टॉलधारकांना स्वतः:हून बांधकाम हटविण्यास सांगितले. त्यानुसार दोन स्टॉलधारकांनी बांधकाम हटविण्यास सुरवात केली होती.

या प्रकाराची माहिती मिळाल्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अशोक सावंत, बाबा परब, योगेश तोडणकर, भाई मांजरेकर, गणेश तोडणकर, दाजी सावजी, छोटू सावजी, बाबू तोडणकर, जॉनी फर्नांडिस यांनी बंदर जेटी येथे दाखल होत प्रादेशिक बंदर अधिकारी तोपणो यांच्याशी चर्चा केली. किनारपट्टीवरील स्टॉलधारकांनी बांधकाम करताना बंदर विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई करावी लागले असे बंदर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी बंदर जेटी येथे भेट देत बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्या पदाधिकारी व संबंधित स्टॉलधारक यांनी आठ दिवसांची मुदत मिळावी यासाठी बंदर विभागाच्या अधिकारी सुषमा कुमठेकर यांना निवेदन सादर केले.

पर्यटकांना फटका
किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेतील होडी व्यावसायिकांना सर्व्हेची पावती सादर करणे आवश्‍यक असल्याने बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पावतीची आज संबंधित होडी व्यावसायिकांकडे मागणी केली. मात्र, संबंधित होडी व्यावसायिकांना अद्यापही सर्व्हेची पावती प्राप्त झालेली नव्हती. त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद करण्याची सूचना करण्यात आली. याचा फटका किल्ले दर्शनास आलेल्या पर्यटकांना बसला.