‘स्वाभिमान’ची दुकानदारी सेनाच बंद करेल - वैभव नाईक

‘स्वाभिमान’ची दुकानदारी सेनाच बंद करेल - वैभव नाईक

कणकवली - ‘‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय दुकानदारीसाठीच स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. नगरपंचायतीच्या या निवडणुकीत स्वाभिमानची दुकानदारी शिवसेनाच बंद करणार आहे,’’ असा इशारा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला.

कणकवली शहर आणि जिल्ह्यात राणेंना विकास करता आलेला नाही. शिवसेनेच्या सत्ता कालावधीत जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाल्याचेही ते म्हणाले.

येथे श्री. नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, सुजित जाधव, शेखर राणे, संजय पारकर, प्रमोद मसुरकर, भूषण परुळेकर, महेश देसाई आदी उपस्थित होते. श्री. नाईक म्हणाले, ‘‘शिवसेना, काँग्रेस या पक्षांचा प्रवास केल्यानंतर राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे.

राजकीय दबाव आणून नाणार प्रकल्पाला विरोध करायचा आणि मंत्रिपद मिळण्याची स्वप्ने पाहायची अशी दुकानदारीच राणेंनी सुरू केली आहे; पण शिवसेना पक्ष प्रथमच कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत उतरलेल्या राणेंच्या स्वाभिमानची दुकानदारी मोडीत काढणार आहे. 

कणकवली नगरपंचायतीवर राणेंची गेली १० वर्षे सत्ता आहे. या कालावधीत त्यांच्याच कार्यकर्त्यांची दुकानदारी शहरात सुरू होती. त्यामुळे क्रीडांगण, सांडपाणी व्यवस्था, कचरा आदी प्रश्‍न त्यांना मार्गी लावता आलेले नाहीत. याउलट डीपी रोडच्या माध्यमातून राणेंच्या कार्यकर्त्यांचाच मोठा विकास झाला, ही बाब सर्व शहरवासीयांना माहिती आहे.’’

ते म्हणाले, ‘‘शहराच्या विकासासाठी शिवसेनेने निधी आणला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नगरपंचायतीसाठी नगरोत्थान योजनेतून भरघोस निधी दिला. त्यातून झालेल्या विकासकामांची उद्‌घाटने आता सत्ताधारी करीत आहेत. लवकरच शहरात वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू होणार आहे. बांधकरवाडी रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला शिवसेनेमुळे गती मिळाली आहे.’’

शहर शिवसेनेच्या माध्यमातून शहरात पैठणी स्पर्धा झाली. याला शहर व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचीही दखल नारायण राणेंना घ्यावीशी वाटली. या कार्यक्रमावर त्यांनी टीका केली. यातूनच शिवसेनेची ताकद राणेंना उमगली असल्याचे श्री. नाईक म्हणाले. शिवसेनेच्या वतीने ४ मार्चला जिल्ह्यात शिवजयंती उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com