पक्षादेश न पाळल्यास नितेश राणेंवरही होणार कारवाई - विकास सावंत

पक्षादेश न पाळल्यास नितेश राणेंवरही होणार कारवाई - विकास सावंत

सावंतवाडी - काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षाचे आदेश पाळावेच लागतील. पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता अन्य पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार्‍या सदस्यांवर कारवाई अटळ आहे. त्यात आमदार नितेश राणे सुध्दा सुटणार नाही. राज्य कार्यकारिणीकडुन त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

ही कारवाई पक्षांतर्गंतबंदीनुसार करण्यात येणार आहे. कोणी आदेश डावलण्याचा प्रयत्न केल्याच जिल्हाधिकारी किंवा आयुक्तस्तरावरच याबाबतचे निर्णय ठरतील आणि तसे प्रकार जिल्ह्यात झाले आहेत. त्यामुळे कोणासोबत राहणे योग्य याचा विचार पदाधिकार्‍यांनी करावा, असेही सावंत यांनी सांगितले.

श्री. सावंत यांनी आज येथील राणी पार्वतीदेवी हायस्कुलमधील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष रविंद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष बाबल्या दुभाषी, चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्याची विस्तार कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले “जिल्हा परिषदेवर आजही काँग्रेसची सत्ता आहे. काही पंचायत समितीही काँग्रेसच्या ताब्यात आहेत; मात्र आज काही लोकप्रतिनिधी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून दुसर्‍या पक्षाच्या बॅनरखाली वावरत आहेत. हे चुकीचे असून काँग्रेसपक्ष ज्या ज्या वेळेला अशा लोकप्रतिनिधींना पक्षाच्या बैठकांना बोलावेल. त्यावेळी त्यांनी बैठकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या कोणाकडून हा आदेश मोडला जाईल, त्याला पक्षाच्या तरतूदीनुसार कायद्याने नोटिसा बजाविण्यात येणार आहे. आमदार नितेश राणे यांच्याबाबतही हा नियम लागू असणार आहे; मात्र ते आमदार असल्याने त्याच्यावर राज्यस्तरावरून नोटीस बजाविण्यात येणार आहे.”

तालुक्यात उघडकीस आलेली गांजा पार्टी प्रकरण हे युवा पिठीसाठी धोकादायक आहे. प्रशासनाने विशेषत: पोलिस प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. आज ज्या पक्षाचे गृहराज्यमंत्री आहेत त्याच सत्ताधारी शिवसेना पक्षाचे लोक आंदोलनाची भाषा करतात हे हास्यास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणात काँग्रेस पक्षाकडून वरिष्ठ पातळीवर निवेदन देण्यात येणार असून यामध्ये कोणतीही व्यक्ति असल्यास त्याला पाठिशी घालण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका राहणार आहे

- विकास सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

देशात धर्मनिरपेक्षता धोक्यात आली असुन विरोधी पक्ष म्हणून येत्या 26 जानेवारीला कुडाळ येथे चार वाजता सविधान बचाव कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळीच उपस्थित राहणार आहे. तर ओरोस येथे जैतापकर कॉलनी येथे मध्ये काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. शिवाय येत्या फेब्रुवारीच्या शेवटी पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

नगराध्यक्ष उमेदवार निवडीसाठी आवाहन

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आमची स्वबळावर लढण्याची तयारी होती; मात्र त्याचा फायदा शिवसेना, भाजपला होवू नये, म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेवून लढण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी आपले अर्ज संपुर्ण माहितीसह तालुका काँग्रेस कमिटीकडे सादर करावेत, असे आवाहन सावंत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com