प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मेपर्यंत नकोत - विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

आता शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र सुरु झाल्यामुळे शिक्षकांच्या बदल्या मे २०१८ पर्यंत करु नये असे ग्रामीण विकास विभागाला कळविणयात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्य शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना सांगितले.

कुडाळ -  शालेय पोषण आहार योजनेसाठी पूर्वीच्याच ठेकेदारांना आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशासकीय बाबी पूर्ण करुन नोव्हेंबर अखेरपर्यंत योजना पूर्ववत कार्यान्वीत करण्यात येईल आणि आता शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र सुरु झाल्यामुळे शिक्षकांच्या बदल्या मे २०१८ पर्यंत करु नये असे ग्रामीण विकास विभागाला कळविणयात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्य शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना सांगितले.

याबाबत शिक्षक समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २६, २७, २८ डिसेंबर दरम्यान होवू घातलेल्या राज्य शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक महाअधिवेशनासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत करण्यासाठी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे-पाटील, महासचिव उदय शिंदे, कार्यालयीन चिटणीस महादेव माळवदकर, कोषाध्यक्ष किरण गायकवाड, उपाध्यक्ष भीवाजी कांबळे यांनी मंत्रालयात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली.

भेटीदरम्यान शालेय पोषण आहार योजनेतील अनियमितता आणि शिक्षक बदल्यासंदर्भात निर्माण या दोन समस्या शिक्षक समिती शिष्टमंडळाने तावडे यांच्यासमोर मांडल्यावर तावडे यांनी पोषण आहार योजना नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ववत कार्यान्वीत करण्याची कार्यवाही प्रशासकीय स्तरावर सुरु आहे. मे २०१८ पर्यंत शिक्षक बदल्या  करु नये असे ग्रामीण विकास विभागाला कळविण्यात येईल असे त्यांनी सागितले. असे पत्रकात राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, दादा जांभवडेकर यांनी म्हटले आहे.