यंदाही सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे रडगाणे शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात पाऊस परतीच्या वाटेला लागला आहे. यंदा शेवटच्या टप्प्यात दमदार पाऊस झाला असला तरी बरेचसे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेले. यामुळे येत्या हंगामात टंचाईचे चित्र कायम राहिल अशी भिती आहे. यामुळे आतापासूनच टंचाई निवारण उपाययोजना आखण्याच्या दिशेने पावले टाकण्याची गरज व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात पाऊस परतीच्या वाटेला लागला आहे. यंदा शेवटच्या टप्प्यात दमदार पाऊस झाला असला तरी बरेचसे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेले. यामुळे येत्या हंगामात टंचाईचे चित्र कायम राहिल अशी भिती आहे. यामुळे आतापासूनच टंचाई निवारण उपाययोजना आखण्याच्या दिशेने पावले टाकण्याची गरज व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी अन्य जिल्ह्याच्या प्रमाणात अधिक पाऊस पडतो. यावर्षीही मुबलक पाऊस होवून येथील पाणी पुरवठा करणारी धरणे, तलाव, विहीरी १०० टक्के भरली आहेत; मात्र पाऊस कमी होताच येथील नदी-नाल्याचे प्रवाह कमी होतात. त्यामध्ये वेळीच पाणी अडविण्याचे नियोजन होत नसल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

जिल्ह्यात सुमारे पाचशेहून अधिक पक्के बंधारे आहेत. मात्र त्यापैकी २५ टक्केही बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले जात नाही. काही बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याने आणि त्यांच्या दुरुस्तीवर निधी खर्च केला जात नसल्याने त्यामध्ये पाण्याचा साठ होत नाही तर काही बंधारे सुस्थितीत असूनही पाणी अडविले जात नाही हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईचे प्रमुख कारण आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाकडून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले जाते. गतवर्षी ७ हजार बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट होते; मात्र प्रत्यक्षात ५० ते ६० टक्के एवढेच बंधारे बांधले. बांधलेले बंधारेही उशिराने फेब्रुवारीपर्यंत बांधल्याने त्यामध्ये पाण्याचा साठा मुबलक झाला नाही. केवळ उद्दीष्टपूर्ततेसाठी बंधारे बांधले जात असल्याने पाणी टंचाईचे चटके दरवर्षी सोसावे लागत आहेत.

जिल्ह्यात आता पाऊस परतीच्या प्रवासाला लागला आहे. अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन झालेले नाही. जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत बंधारे बांधले गेले तरच मोठ्या प्रमाणात (मुबलक) पाण्याचा साठा बंधाऱ्यांमध्ये होवू शकतो आणि संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याचा यशस्वी पर्याय निघू शकतो. त्यासाठी आतापासूनच कच्चे व वनराई बंधाऱ्याचे नियोजन होण्याची गरज आहे.