मुलीचा विनयभंग करणाऱ्या नेमळेतील एकास कारावास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नेमळे (ता. सावंतवाडी) येथील आरोपी संतोष अनंत करंगुटकर (वय 26) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विभा विरकर यांनी दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पीडित मुलगीसह तिच्या मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर यांनी काम पाहिले.

दहावीत शिक्षण घेणारी पीडित मुलगी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना आरोपी संतोष याने अश्‍लील हावभाव केले व त्या ठिकाणावरून पळ काढला. ही घटना 16 डिसेंबर 2014 ला घडली होती. त्यानंतर 24 डिसेंबर 2014 ला हीच पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसह सायंकाळी 4.45 च्या सुमारास आपल्या घरी जात असताना संतोष मोटारसायकलवरून आला व त्या पीडित मुलीचा हात पकडून पुन्हा अश्‍लील हावभाव करून दाखविले व तेथून पळ काढला. पीडित मुलीने या प्रकाराबाबत त्याच दिवशी कुडाळ पोलिस ठाण्यात जाऊन संतोष विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार कुडाळ पोलिसांनी संतोषच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली होती.