सिंधुदुर्गनगरी जि.प. अध्यक्षपदी रेश्‍मा सावंत

सिंधुदुर्गनगरी जि.प. अध्यक्षपदी रेश्‍मा सावंत

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या रेश्‍मा सावंत तर उपाध्यक्षपदी रणजित देसाई यांची आज वर्णी लागली. स्वतंत्रपणे निवडणूक लढलेल्या शिवसेना-भाजपने एकत्र येत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत सहभाग घेतला; मात्र काँग्रेसने बाजी मारली. या निमित्ताने नव्या जिल्हा परिषदेत सक्षम विरोधी पक्ष असेल, याचे संकेत मात्र मिळाले आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. पीठासीन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी ही प्रक्रिया घेतली. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रेश्‍मा सावंत यांना २८ तर शिवसेनेच्या वर्षा पवार यांना २२ मते मिळाली. त्यामुळे सावंत सहा मतांनी विजयी झाल्या. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या देसाई यांनाही २८ तर भाजपच्या सुधीर नकाशेंना २२ मते मिळाली. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २७, राष्ट्रवादीचा एक, शिवसेना १६ तर भाजपचे ६ सदस्य आहेत. ही निवडणूक आघाडी विरुद्ध युती अशी झाली.जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता होती. अनेक वर्षे सावंतवाडीला अध्यक्षपद मिळाले नव्हते. या वेळी शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही सावंतवाडीने काँग्रेसला भरीव यश दिले. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ तिसऱ्यांदा सदस्य झालेल्या रेश्‍मा सावंत यांच्या गळ्यात पडेल, अशी शक्‍यता होती. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सावंत यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी दिली. उपाध्यक्षपदी कुडाळमधील नेरूर मतदारसंघातून विजयी झालेल्या रणजित देसाई यांना दुसऱ्यांदा या पदावर संधी देण्यात आली आहे. त्यांनी या आधीची उपाध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वीरीत्या पार पाडली होती. कृषी महोत्सवाचे आयोजन त्यांच्या कारकिर्दीमधील माईल स्टोन ठरला होता.

अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे सौ. सावंत आणि उपाध्यक्षपदासाठी श्री. देसाई यांनी अर्ज भरला. या वेळी आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, मावळते अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, अशोक सावंत, सतीश सावंत, गोट्या सावंत आदी उपस्थित होते. शिवसेनेतर्फे अध्यक्षपदासाठी वर्षा पवार आणि उपाध्यक्ष पदासाठी श्री. नकाशे यांनी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, संजय पडते, सदाशिव ओगले आदी युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीसाठी प्रशासनाने तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक आयोजित केली होती. अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत कुणीच अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. हात वर करून घेतलेल्या निवडीत काँग्रेसने बाजी मारली.

जिल्हा परिषदेच्या गेल्या तीन टर्म सत्ताधाऱ्यांकडे मोठे बहुमत होते. यामुळे विरोधी पक्ष दुबळा पडल्याचे चित्र होते. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपने एकत्र येत सक्षम विरोधी पक्ष असल्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. सौ. सावंत यांनी श्री. प्रभूगावकर यांच्याकडून तर श्री. देसाई यांनी श्री. नाडकर्णी यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली.

माजगावला दुसऱ्यांदा अध्यक्षपद
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अध्यक्षपद सावंतवाडी तालुक्‍याला देऊन शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांना एक प्रकारे राजकीय शह दिला आहे. सौ. सावंत सावंतवाडीलगतच्या माजगाव येथील असून या गावाला दुसऱ्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले. पूर्वी अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या गावचे सुपुत्र भाईसाहेब सावंत यांनी भूषविले होते.

कुडाळ मिळविण्याचे देसाईंपुढे आव्हान
मावळत्या जिल्हा परिषदेमध्येही रणजित देसाई यांनी उपाध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली होती. आगामी विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसने कुडाळला त्यांच्या रूपाने पुन्हा पद दिल्याचा अंदाज बांधला जात आहे. श्री. देसाई यांची राणे कुटुंबीयांशी जवळीक आहे. कुडाळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारली होती. काँग्रेसचे या तालुक्‍यात कमबॅक करण्याचे आव्हान श्री. देसाई यांच्यासमोर असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com