वाहतूक, रस्ते विकासाचे तीन-तेरा

नंदकुमार आयरे 
शुक्रवार, 9 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरीची निर्मिती होवून २५ वर्षे लोटली तरी अद्यापही येथे वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांचा विकास झालेला नाही. जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना तासन तास एसटी सेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरीची निर्मिती होवून २५ वर्षे लोटली तरी अद्यापही येथे वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांचा विकास झालेला नाही. जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना तासन तास एसटी सेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्हा मुख्यालय निर्मितीनंतर येथील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांच्या झपाट्याने विकास होण्याची गरज होती; मात्र येथे प्रस्तावित असलेला एसटी आगार गेली पंचवीस वर्षे प्रतिक्षेस ाहे. एसटी डेपोसाठी जागा निश्‍चित झालेली असतानाही बांधकामाकडे दुर्लक्षच झाले. सध्या याचे काम रडत-खडत सुरू आहे. सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या जनतेला एसटी सेवेची तासनतास प्रतिक्षा करावी लागत आहे. ठराविक वेळेत आणि कार्यालयीन वेळेत सुटणाऱ्या एसटीच्या वेळा निश्‍चित असल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या जनतेला जिल्हा मुख्यालयात ये-जा करण्यासाठी तासनतास एसटीच्या प्रतिक्षेत रहावे लागत आहे. एसटीच्या अनियमित सेवेव्यतिरिक्त या ठिकाणी अन्य कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.

सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय हे ठिकाण मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथे जाणाऱ्या एसटी गाड्या वेळेवर नसल्याने व ठराविक  वेळेतच असल्याने प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. गोरगरीब जनतेसाठी ही खर्चिक बाब आहे. जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या एसटी फेऱ्याही कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. तर येथील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून केवळ या रस्त्याची डागडूजी केली जाते. खड्डे बुजवून केवळ मलमपट्टी दरवर्षी केली जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर जीवघेणे धोकादायक खड्डे पडले आहेत. त्याकडे प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा विकास खुंटला आहे.

डेपोचे उद्‌घाटन केव्हा?
जिल्हा मुख्यालयाच्या निर्मितीनंतर एसटी डेपो व्हावा, अशी अनेक वर्षापासून जनतेची मागणी आहे; मात्र २५ वर्षानंतर आता सिंधुदुर्ग पोलिस ठाण्यासमोरील मोकळ्या जागेत एसटी डेपो बांधकाम सुरू झाले आहे. यामुळे काही प्रमाणात येथे येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण हे काम पूर्ण केव्हा होणार आणि एसटी डेपोचे उद्‌घाटन केव्हा होणार? याची प्रतिक्षा सुरू झाली आहे.