सिंधुदुर्गात शिकवणीवर्गाची संस्कृती रुजतेय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

खासगी क्‍लासेसकडे विद्यार्थी गेले तरी शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यांचा विचार केला जातो. काही वेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही म्हणून ते हा निर्णय घेतात.

- प्रा. प्रतिभा चव्हाण
 

काही शासकीय शाळांमधील सुविधा मर्यादित असल्याने खासगी शाळा किंवा खासगी क्‍लासकडे मुलांचा कल वाढत आहे. तेथे चांगले शिक्षण मिळत असल्याची पालकांची मानसिकता असते.
- आत्माराम पालेकर, जिल्हा परिषद, शिक्षण सभापती

सावंतवाडी : बदलत्या काळाबरोबर शिक्षण पद्धतीतही बदलत होत असताना जिल्ह्यातही खासगी शिकवणीवर्गाची संस्कृती रुजू लागली आहे. जास्त ज्ञान वृद्धिंगत करण्याचे हे पर्यायी माध्यम असल्याची पालकांची मानसिकता वाढू लागल्याने जिल्ह्यातील शहरांबरोबर ग्रामीण भागातही हे वर्ग दिवसेंदिवस वाढत आहेत.
शिक्षण हे आजच्या काळात ज्ञान मिळविण्याचे एक प्रभावी व मूलभूत साधन बनले आहे; मात्र आजच्या शिक्षण पद्धतीवर बऱ्याच समस्या दिसून येतात. सर्वच शाळांत याचे स्वरूप एकसारखे नसले, तरी शिक्षकांच्या रिक्‍त जागा, शाळेच्या भौतिक सुविधा, परीक्षा पद्धती, शिक्षकांची अध्यापन पद्धती अशा वेगवेगळ्या समस्या आढळतात. बदलत्या काळात काही शाळांत, महाविद्यालयांत शैक्षणिक समस्याही आहेत. त्याचा परिणाम विद्याकलनाचे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. त्यामुळे आजकालची पिढी शाळेतील शिक्षणाबरोबरच खासगी शिकवणीकडेही वळताना दिसत आहे.
 

खासगी शिकवणीबरोबरच विनाअनुदानित शाळा आज आपला शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खासगी शाळांही आज आकर्षणाचा एक वेगळा केंद्र बिंदू ठरत असल्यामुळे शासनाच्या शाळेत पाठविण्याऐवजी काही उच्च व मध्यमवर्गीय पालक शैक्षणिक गुणवत्ता व भविष्याचा विचार करता विनाअनुुदानित, खासगी तसेच खासगी शिकवणीवर्गाची निवड करत आहेत. शहरी भाग यात मागे नसून शाळा असूनही खासगी शिकवणीवर्ग असे जणू रोजचेच समीकरण बनले आहे. आपल्या पाल्यांच्या भविष्याचा विचार करता पालकच याचा निर्णय घेत आहेत. ग्रामीण भागही याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. शिक्षकीपेशा निवडणारे उमेदवार पयार्य म्हणून, तसेच व्यावसायिक पार्श्‍वभूमीसाठी शिकवणीवर्ग घेत आहेत. ज्ञानदान व मार्गदर्शन करण्याची क्षमता असलेले पदवीधर उच्च, पदवीधर, तसेच काही निवृत्त शिक्षकही खासगी शिकवणी व्यवसाय व छंद म्हणून याकडे वळताना दिसत आहेत.

जिल्ह्यात अशा शिकवणवर्गांची संख्या मोठी आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासनाच्या शाळांतील सुविधांचा अभाव, अध्यापन पद्धती अशा विविध कारणांमुळे मुले खासगी शिकवणी वर्गाकडे वळताना दिसत आहेत. जिल्ह्यातील शहरीभागांबरोबर ग्रामीण भागातही या शिकवणीवर्गांचा प्रसार होत आहे. इंग्रजी, सेमी इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे ही शिकवणीवर्गही विद्यार्थ्यांची महत्त्वाचे घटक झाले आहेत.

Web Title: Singing tuition class culture rujateya