चिपळुणात आणखी सहा गावांची टॅंकरची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

चिपळूण - उकाड्यात वाढ झाल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. नद्या व विहिरी आटल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या तालुक्‍यातील १३ गावे आणि २८ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या टंचाईमुळे आणखी सहा गावांनी टॅंकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

तालुक्‍यात गेल्या दोन महिन्यांपासून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकरसाठी प्रशासनाचा साडेतीन लाखांचा खर्च झाला आहे. तालुक्‍यातील अडरे, टेरव, गाणे येथील काही वाड्यांमध्ये फेब्रुवारीमध्येच टॅंकरची मागणी करण्यात आली होती. मार्चच्या अखेरीस तालुक्‍यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. गेल्या दीड महिन्यात सातत्याने तालुक्‍यातील गावांमधून टॅंकरची मागणी वाढत आहे. १५ मेपर्यंत तालुक्‍यात १३ गावे आणि २८ वाड्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस सुरू होण्यास अद्याप २० ते २५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. पाणी योजनांच्या उद्‌भव विहिरीतील पाणीच आटल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते आहे. तालुक्‍यातील गांग्रई, शिरवली, आकले, ओमळी, वाघिवरे, फुरूस या गावांनी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या गावांमध्ये टॅंकर सुरू केला जाईल. गांग्रई हे आमदार सदानंद चव्हाण यांचे गाव असून तेथेही पाणीटंचाई जाणवत आहे. वाघिवरे गावासही दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. येथील ग्रामस्थांवर खाडी पार करून खेड तालुक्‍यातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या सहाही गावांना टॅंकरची प्रतीक्षा आहे.