सैनिक पाटकर यांना शोकाकुल वातावरणात निरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

माणगाव - शिवापूर येथील झिमणेवाडीतील रहिवासी व सैन्यात कार्यरत हरिश्‍चंद्र ऊर्फ हरी गोपाळ पाटकर (वय ४५) यांचे पार्थिव आज सकाळी शिवापूर येथे आणण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर खासगी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने पाटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पत्नी, मुलीसह नातेवाइकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

माणगाव - शिवापूर येथील झिमणेवाडीतील रहिवासी व सैन्यात कार्यरत हरिश्‍चंद्र ऊर्फ हरी गोपाळ पाटकर (वय ४५) यांचे पार्थिव आज सकाळी शिवापूर येथे आणण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर खासगी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने पाटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पत्नी, मुलीसह नातेवाइकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

शिवापूरला सैनिकांचा वारसा लाभलेले गाव म्हणून ओळखले जाते. हरिश्‍चंद्र पाटकर हे गेली २३ वर्षे सैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मोठा मुलगा गोपाळ हा अभियांत्रिकी शिकत असून मुलगी कोमल ही सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शिक्षण घेते. ५ मार्चला श्री. पाटकर ड्युटीवर रुजू असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांच्यावर जम्मू येथील रुग्णालयात उपचार चालू होते. याची माहिती समजताच त्यांचा भाऊ व मुलगा त्यांना पाहण्यासाठी जम्मू येथे गेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी दोन वाजता त्यांच्या मेंदूत रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. त्यापूर्वी त्यांचा भाऊ व मुलगा गावी यायला निघाले. वाटेतच त्यांना हरिश्‍चंद्र यांच्या निधनाची बातमी समजली.

या घटनेने संपूर्ण शिवापूर गावावर शोककळा पसरली. रविवारी त्यांचे पार्थिव जम्मूवरून दिल्ली व दिल्लीवरून गोवा येथे विमानातून आणण्यात आले. आज सकाळी त्यांचे पार्थिव सकाळी सव्वानऊ वाजता शिवापूर येथे दाखल झाले. संपूर्ण शिवापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी सैनिक, अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या घरी आणताच घरातील मंडळींनी एकच आक्रोश केला. या वेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. आरोग्य विभागाचे अधिकारी त्यांच्या घरी उपस्थित होते. त्यांची पत्नी श्रीमती सुवर्णा व मुलगी कोमल यांच्या आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हरिश्‍चंद्र पाटकर यांच्या पार्थिवासोबत जम्मू- काश्‍मीरचे नायब सुभेदार योगिंदर सिंग उपस्थित होते. मराठा टीए बटालियन कोल्हापूरचे सैनिक नाईक नाना गुंजाळ व शिपाई दीपक गावडे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. 

हरिश्‍चंद्र यांचे पुत्र गोपाळ यांनी चितेला अग्नी दिला. या वेळी सरपंच आनंदी सुतार, माजी सभापती मोहन सावंत, ॲड. सुधीर राऊळ, पांडुरंग राऊळ, मधुकर राऊळ, सोनू पाटकर यांच्यासह पोलिस मुख्यालय राखीव पोलिस उपनिरीक्षक संपत सिदाम, माणगाव आउट पोस्टचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय चव्हाण, सदानंद सावळ, अजय फोंडेकर आदी उपस्थित होते.

जम्मू-काश्‍मीर येथे कार्यरत असताना हरिश्‍चंद्र पाटकर यांचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाल्याचे समजताच राज्यमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, पंचायत समिती सदस्य सौ. श्रेया परब, अभय शिरसाट, राजन नाईक यांच्यासह कुडाळचे प्रांताधिकारी विलास सूर्यवंशी, तहसीलदार अजय घोळवे, जिल्हा सैनिक कार्यालय ओरोसचे सुभेदार एकनाथ पवार, उमेश आईर, आप्पासाहेब जावळे व जिल्हा सैनिक कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.