उधाणाचे संकट नागरिकांच्या उंबरठ्यापर्यंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाचे मोठे संकट किनाऱ्यावरील रहिवाशांवर येऊन धडकले आहे. गेले तीन दिवस उधाणामुळे तालुक्‍यातील अनेक ठिकाणचा किनारी भाग धुऊन गेला आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचीही धूप रोखण्यास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. समुद्राचे पाणी काही ठिकाणी रहिवाशांच्या उंबरठ्यात येऊन ठेपल्याने मोठा धोका निर्माण झाला. यामुळे अशा परिसरातील नागरिक भयग्रस्त आहेत.

कोकण किनारपट्टीवर 2009 मध्ये आलेल्या "फियान‘ वादळामुळे समुद्र किनारी भागाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर किनारी भागाचे मोठे नुकसान पाऊस व उधाणामुळे होत आहे. यापूर्वीच्या पावसामध्ये उधाणाची भरती येत होती; परंतु समुद्राच्या लाटांचे पाणी आणि त्याचा तडाखा मर्यादित होता. यंदाच्या उधाणाच्या भरतीने कहर करीत आजवरचे रेकॉर्ड तोडले आहे. उधाणाच्या सुमारे पाच ते सहा मीटरच्या लाटा किनाऱ्यावर आदळत आहेत. त्यामुळे जयगड, गणपतीपुळे, काळबादेवी, मिऱ्या, मांडवी, पूर्णगड आदी भागातील किनाऱ्यांची मोठी धूप झाली आहे. रस्ते, झाडे, किनारे धुऊन गेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांनाही ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. 

पांढरा समुद्र, पंधरामाड, जाकीमिऱ्या, भाटीमिऱ्या आदी ठिकाणचे बंधारे दोन दिवसांपूर्वी वाहून गेल्याने भगदाड पडले आहे. धोका लक्षात घेऊन आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नाने काही ठिकाणी सुरक्षेसाठी तत्काळ टेट्रापॉड टाकण्यात आले. मात्र समुद्राच्या तडाख्याने किनाऱ्याची धूप सुरूच आहे. आज पुन्हा वरील भागांमध्ये किनाऱ्यांना दणका बसला. त्यामुळे दगड, टेट्रापॉड, झाडे समुद्राने गिळंकृत केली आहेत. या नैसर्गिक आपत्तीपुढे प्रशासनाने हात टेकले आहेत.