रेल्वे प्रवाशांच्या खिशाला सुट्ट्या पैशांअभावी चाट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

चिपळूण - येथील रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना आणण्यासाठी जाणाऱ्या चिपळूण आगारातील एसटीचे वाहक प्रवाशांना सुट्टे पैसे देत नाहीत. त्यामुळे एका फेरीमागे प्रवाशांचे १०० ते २०० रुपयांचे नुकसान होत आहे. याबद्दल प्रवाशांनी पत्रकारांपाशी नाराजी व्यक्‍त केली. सुट्ट्या नाण्यांचे कारण पुढे करून प्रवाशांना नाडले जात आहे.

चिपळूण - येथील रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना आणण्यासाठी जाणाऱ्या चिपळूण आगारातील एसटीचे वाहक प्रवाशांना सुट्टे पैसे देत नाहीत. त्यामुळे एका फेरीमागे प्रवाशांचे १०० ते २०० रुपयांचे नुकसान होत आहे. याबद्दल प्रवाशांनी पत्रकारांपाशी नाराजी व्यक्‍त केली. सुट्ट्या नाण्यांचे कारण पुढे करून प्रवाशांना नाडले जात आहे.

रेल्वेने दूरवरचा प्रवास करून कंटाळून येणाऱ्या प्रवाशाला घरी जाण्याची घाई असते. तो सुट्ट्या पैशांकडे दुर्लक्ष करतो. याचा फायदा घेऊन प्रवाशांना सुट्टे पैसे देण्यास टाळाटाळच केली जाते. वालोपे रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या गाड्यांमुळे एका फेरीत शंभर ते दोनशे रुपयांची एसटीला वरकमाई होते.

कोकण रेल्वेने वालोपे येथील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना आणण्यासाठी चिपळूण आगारातून गाड्या सोडल्या जातात. खासगी वाहतूकदार आणि रिक्षावाले प्रवाशांची पिळवणूक करतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी चिपळूण आगारातून स्वतंत्र गाड्या सोडल्या जातात. वालोपे ते चिपळूण बस स्थानकापर्यंतचे तिकीट सात रुपये आहे. एसटीमध्ये येणाऱ्या प्रवाशांना सुट्टे पैसे काढून ठेवण्याची विनंती वाहक करतात. फार कमी प्रवासी सुट्टे पैसे देऊन तिकीट घेतात. जे दहा किंवा जास्त रकमेची नोट वाहकाला देतात, त्यांना प्रथम वाहकाचे चार शब्द ऐकावे लागतात. एखाद्या प्रवाशाने पन्नास रुपये दिले, तर वाहक चाळीस रुपये परत देतात. तीन रुपये देण्यासाठी वाहकाकडे नाणी नसतात. त्यामुळे पैसे सुट्टे झाल्यानंतर किंवा बसस्थानकावर गेल्यानंतर उर्वरित पैसे घ्या, असे वाहक प्रवाशांना सांगतात. इतर प्रवाशांनी वाहकाला सुट्टे पैसे दिले तरी अनेक वेळा प्रवाशांना ते दिले जात नाहीत. गाडीमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त असतात. प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असते. त्यामुळे अनेक वेळा प्रवासी तीन रुपये न घेताच गाडीतून उतरतात. बस स्थानकावर एसटी गेल्यानंतर वाहक तत्काळ डेपोकडे जातात. त्यामुळे वाहकाला शोधत सुट्टे पैसे मागण्याची मानसिकता प्रवाशाकडे नसते. 

मला खेर्डीत जायचे होते. वालोपे रेल्वे स्थानकावर आलेल्या एसटीमध्ये बसलो. वाहकाला दहा रुपये दिल्यानंतर त्याने सात रुपयाचे तिकीट दिले. तीन रुपये देण्यासाठी सुट्टे नसल्याचे सांगितले. त्याच्या विनंतीनुसार तीन रुपये घेण्यासाठी मी बस स्थानकापर्यंत आलो. तेथे वाहकाने माझ्याशी वाद घातला. तक्रार करण्याचा इशारा दिल्यावर वाहकाने उर्वरित पैसे दिले.
- कमलाकर शेंबेकर, खेर्डी

Web Title: ST conductor do not give money passengers