प्रतीक्षा यादीतील एसटीचालकांचे कणकवलीमध्ये आमरण उपोषण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कणकवली - एसटी महामंडळाच्या चालकपदाच्या प्रतीक्षा यादीवरील २० उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. एसटी विभागीय कार्यशाळेसमोर सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांशी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. तसेच दोन दिवसांत प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही दिली. दरम्यान, उपोषणकर्त्यांची चर्चा करण्यासाठी आलेले एसटीचे विभाग नियंत्रकांची तब्येत अचानक ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कणकवली - एसटी महामंडळाच्या चालकपदाच्या प्रतीक्षा यादीवरील २० उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. एसटी विभागीय कार्यशाळेसमोर सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांशी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. तसेच दोन दिवसांत प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही दिली. दरम्यान, उपोषणकर्त्यांची चर्चा करण्यासाठी आलेले एसटीचे विभाग नियंत्रकांची तब्येत अचानक ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एसटी महामंडळात सन २०१५ मध्ये चालक, वाहक व इतर पदांची भरती प्रक्रिया झाली होती. त्या वेळी सिंधुदुर्ग विभागात १४९ चालकांची भरती करण्यात आली. त्यातील १२९ उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली, तर उर्वरित २० उमेदवारांना प्रतीक्षा यादीवर ठेवले आहे. भरती प्रक्रिया झाल्यानंतर वर्षभरातच नियुक्‍त झालेले पाच उमेदवार कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्या पाचही जणांची नियुक्‍ती एसटी महामंडळाकडून रद्द करण्यात आली. 

नियमानुसार नियुक्‍त झालेले पाच कर्मचारी कामावर हजर न झाल्याने प्रतीक्षा यादीवरील पाच उमेदवारांना चालकपदी नियुक्‍ती देणे आवश्‍यक होते; परंतु त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. तसेच एसटी सिंधुदुर्ग विभागात चालकांची अनेक पदे रिक्‍त आहेत, तरीही प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना स्थान देण्यात आलेले नाही. याबाबत गेले दोन वर्षे प्रतीक्षा यादीवरील उमेदवार एसटी महामंडळाकडे न्याय मागत आहेत; मात्र एसटीकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर आज (ता.६) पासून या उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्या उमेदवारांमध्ये संदीप सावंत, सचिन तावडे, मच्छिंद्र पाटणकर, अभिजित परब, संदेश राणे, मुदस्सर काझी, आत्माराम जाधव, कुंदन दाभोलकर, कमरूद्दीन शेख, विलास परब, विक्रांत परब, विशाल भिसे आदींचा समावेश आहे. याउमेदवारांची सकाळी अकरा वाजता काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, सुभाष सावंत, शरद कर्ले आदींनी भेट घेतली. या वेळी श्री. सावंत यांनी उमेदवारांचा प्रश्‍नाबाबत आमदार नितेश राणेंशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या वेळी श्री. राणे यांनी चालू असलेल्या अधिवेशनात या प्रश्‍नाबाबत न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. यानंतर दोन उपोषणकर्त्यांसह तालुकाध्यक्ष सुरेश सावंत हे मुंबईला रवाना झाले.

एसटी विभागीय कार्यशाळेसमोर बसलेल्या उपोषणकर्त्यांशी भाजपचे शिशिर परुळेकर यांनीही भेट घेतली. या वेळी श्री. परुळेकर यांनी माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या वेळी श्री. जठार यांनी परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याशी प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रश्‍नाबाबत चर्चा झाली असल्याचे मान्य केले. तसेच उद्या (ता.७) परिवहन राज्यमंत्र्यांसोबत पुन्हा याप्रश्‍नी चर्चा होऊन अंतिम तोडगा काढला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. दरम्यान, उपोषणकर्त्यांनी मात्र नियुक्‍ती मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्‍त केला आहे.

Web Title: st driver fasting