संघटनांच्या संघर्षात कर्मचारी कात्रीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

गुहागर - एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी नोव्हेंबरमध्ये शिवसेनाप्रणित कामगार सेनेत प्रवेश केला. आता एसटी कामगार संघटनेतील सदस्यांना फोडून कामगार सेनेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लढाई सुरू झाली आहे. त्यासाठी कामगार संघटनेच्या सदस्यांना साम, दाम, दंड, भेद, अशी नीती अवलंबिली जात आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी आगारात एसटी कामगार संघटनेचे वर्चस्व होते. राज्यात भाजप-शिवसेनेचे युती सरकार आले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन खात्याचा कारभार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते पाहू लागले. त्यानंतर पक्षवाढीसाठी सर्व आगारात कामगार सेनेची स्थापना करण्यात आली.

एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कामगार सेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याची जबाबदारी शिवसेनेने शिवाजीराव चव्हाणांवर सोपविली आहे. गेली अनेक वर्षे कामगार संघटनेचे काम चव्हाण पाहात असल्याने अनेक आगारातील त्यांच्या मर्जीतील कामगारांनी कामगार संघटनेला रामराम ठोकून कामगार सेनेत प्रवेश केला. तरीही वर्षानुवर्ष कामगारांसाठी लढणाऱ्या एसटी कामगार संघटना कोकणातील आगारातून आजही बळकट आहे. या संघटनेचे वर्चस्व पूर्णपणे मोडून काढण्यासाठी आगारातील कामगार सेनेचे कार्यकर्ते कार्यरत झाले आहेत.

कामगार सेनेतील पदाधिकारी एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामगार सेनेचे सदस्य होण्यासाठी विनंती करीत आहेत. जे सदस्य होतील त्या चालक-वाहकांना हव्या असलेल्या फेऱ्यांवर ड्युटी लावली जाते, असा आक्षेप आगारात घेतला जात आहे. यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांची कामे केली आहेत, त्याच्यावर दबाव टाकून कामगार सेनेचे सदस्य होण्यास भाग पाडले जाते. कामगार सेना सदस्याच्या रजेकडे दुर्लक्ष करायचे. कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्याला अडकवायचे, असे राजकारण सुरू झाले आहे. या सर्व गोष्टींचा ताप एकाएका कर्मचाऱ्याला होतो. त्यामुळे दोन्ही संघटनांचे पदाधिकारी या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. दोन संघटनांमध्ये सध्या सुरू असलेल्या या छुप्या संघर्षाची परिणती मोठ्या वादात होऊ नये अशी अपेक्षा सामान्य कामगार वर्गातून व्यक्त केली जात आहे.

""संघटनांमधील वादाचे वातावरण गुहागर आगारात नाही. कामगार संघटनेकडून कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव टाकला जात नाही. आमच्यासाठी नोकरीतील कर्तव्य पार पाडणे, एसटीचे हित पाहणे, सर्व कामगारांबरोबर कुटुंब म्हणून राहणे याला आम्ही प्राधान्य देतो.''
- सुहास रानडे, डेपो सचिव, एसटी कामगार संघटना, गुहागर