वीज कार्यालयावर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सावंतवाडीतील प्रकार - पावसामुळे विजेचा खेळखंडोबा; पोलिसांनी जमाव पांगवला

सावंतवाडी - तालुक्‍यात गुरुवारी (ता. ४) झालेल्या पहिल्याच पावसात वीज वितरण कंपनीचा बोजवारा उडाला. दोन ठिकाणी मुख्य वाहिन्यावर झाडे कोसळल्याने रात्री दीडपर्यंत सावंतवाडीकर काळोखात राहिले. त्यामुळे संतप्त  नागरिकांनी   वीज कार्यालयावर धडक देत कार्यालयावर दगडफेक केली. पोलिस आल्याने जमाव पांगल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत करण्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांना यश आले.

शहरात काल सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने अचानक हजेरी लावली. वादळी वाऱ्यांसह विजेच्या गडगडाटासह पाऊस हजर झाला. त्यामुळे वीज वितरण कंपनीला याचा फटका बसला. त्याच परिस्थितीत दोन झाडे उन्मळून पडल्यामुळे तसेच कोल्हापुर येथून येणाऱ्या मुख्य वाहिनीत बिघाड निर्माण झाल्यामुळे शहरातील वीज पुरवठा 
खंडित झाला.  

या वेळी नागरीकांनी विज कंपनीच्या कार्यालयात दूरध्वनी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी फोन बाजूला काढून ठेवल्यामुळे नागरिकांनी रात्री कार्यालयाकडे धाव घेतली. त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी संतप्त नागरिकांकडून जाब विचारण्यात आला. या वेळी अधिकारी ‘फॉल्ट’ शोधण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे आम्ही काहीच सांगू शकत नाही, असे सांगून त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मारून नेण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे फोन बिझी लागत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी कार्यालयावर दगडफेक करण्यास सुरवात केली.

हा प्रकार पाहून त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. काही वेळाने त्या ठिकाणी पोलिस आले. त्यामुळे जमाव पांगला. त्यानंतर तब्बल रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत विजेचा खेळखंडोबा 
सुरू होता.

पोलिसांत तक्रार नाही
याबाबत येथील कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना विचारले असता ते म्हणाले,‘‘झाडे कोसळल्यामुळे तसेच कोल्हापूर येथून येणारा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. दुसरीकडे कुडाळ येथील लाईन बंद पडली. त्यामुळे हा पुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागला. या काळात त्या ठिकाणी जमलेल्या काही लोकांनी दगड मारले. त्याला दगडफेक म्हणता येणार नाही. कोणा विरोधात तक्रार दिलेली नाही.’’