साठवलेल्या पाण्याच्या आधारे हवी शेतीतून समृद्धी

साठवलेल्या पाण्याच्या आधारे हवी शेतीतून समृद्धी

रत्नागिरी - सरकारी पद्धतीने जलसंधारणाचे लक्ष्य पुरे केल्याने झालेला गोंधळ दूर केला पाहिजे. कोकणात साठवलेले आणि जिरवलेले पाणी वापरून गावातील शेतकरी दुसरे पीक घेतील तेव्हाच शेतीतून समृद्धी येईल. नाहीतर पाणी साठवणे आणि जिरवणे याचे टार्गेट पूर्ण; सरकारी काम झाले; पिकांचा वा दुबार शेतीचा पत्ता नाही, असे चित्र कायम राहील. त्याऐवजी पाण्यापासून शाश्वत विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असा आग्रह डॉ. उमेश मुंडल्ये यांनी धरला.

याच्या यशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठी धरणे न बांधता गावपातळीवर जलसंधारणाची कामे स्थळानुरूप (site specific) आणि लोकसहभागातून व्हायला हवीत, असे प्रतिपादन त्यांनी केले. कोकणात पडणाऱ्या पावसाचा विचार करून योग्य ठिकाणी, योग्य प्रकारचे, अगदी गावागावांत अथवा तालुक्‍यातालुक्‍यात बदलावे लागले तरी तसे उपाय योजायला हवेत. डोंगरातून वेगाने येणारे पाणी ठराविक अंतरावर लहान वेंटचे बंधारे बांधून आणि त्यात काही काळ पाणी अडवून त्याचा वेग कमी करावा लागेल. ते पाणी आजूबाजूला जिरवण्यासाठी चेक डॅम्स, शेततळी, पाझर तलाव एवढ्याच उपायांवर न थांबता, वेंट असलेले बंधारे, गॅबिऑन बंडस्‌, झऱ्याचे मुख बांधणे, साठवण तलाव, भूमिगत बंधारे, विहिरींचे पुनर्भरण असे उपाय करायला हवेत. मात्र त्यासाठी योग्य जागा व योग्य नियोजन हवे.

जुने कोल्हापूर टाइप बंधारे आणि गाळाने भरलेले चेक डॅम्स दुरुस्त करून, गाळ काढून परत उपयोगात आणले पाहिजेत. हे करताना त्यात वेंट टाकून मग दुरुस्ती केली, तर त्याचाही पुन्हा उपयोग होऊ शकतो. विहिरींच्या खालच्या पातळीवर भूमिगत बंधारे योग्य प्रकारे बांधले तर विहिरीतील पाणी तीन महिने जास्त टिकून राहते, असा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

पाण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता लोक सहभागातून जलसंधारणाचे नियोजन केले आणि ठिकाणानुसार उपाय योजले तर निश्‍चित फायदा होतो. गाव सुजल आणि सुफल होते हा अनुभव आहे. फक्त हे सारे राजकारणविरहितही हवे, अशी पुस्ती मुंडल्ये यांनी जोडली.

पाणी साठवण्याच्या जागीच शेती 
चेक डॅम म्हणजे सरकारच्या सरधोपट धोरणाचे उदाहरण आहे. जिथे मातीची पाणी धारण क्षमता चांगली आहे (काळी माती) तेथे आणि पाऊस कमी-मध्यम स्वरूपाचा आहे तिथे चेक डॅम्स उपयोगी पडतात. कारण पाण्याबरोबर माती वाहून येत नाही. कोकणात एकदम विरुद्ध परिस्थिती आहे. वर्ष दोन वर्षात बंधारा गाळाने इतका भरतो की पाणी साठवण्याच्या जागी भातशेती करता येते, याकडे डॉ. मुंडल्ये यांनी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com