आरोग्य केंद्र इमारतीसाठी आमदारांचा ध्यास - विनायक राऊत

साखरपा - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत, राजेंद्र महाडिक, जया माने आदी.
साखरपा - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत, राजेंद्र महाडिक, जया माने आदी.

देवरूख - ‘‘जनतेचे आरोग्य चांगले असेल, तर त्यांना आयुष्य जगण्याचा आनंद भरभरून घेता येईल. साखरप्यातील आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आलेली पाहून येथील आमदारांनी साखरपावासीयांसाठी नवी सुसज्ज इमारत पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. त्या कामाचे भूमिपूजन करण्याची संधी आपणाला मिळाली हे भाग्य असल्याचे सांगत शिवसेना दिलेली आश्‍वासने पूर्ण करते’’, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केले.

आमदार राजन साळवींच्या प्रयत्नाने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला. या नव्या केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा खासदार राऊत यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जि.प. शिक्षण सभापती विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, काका कोलते, बापू शिंदे, शेखर आकटे, अजय सावंत, मंगेश दळवी, राजा वाघधरे, कमलेश मावळणकर, विजय पाटोळे, अजित भोसले, सुरेश कदम, दत्ता घुमे, महेश सावंत, दीपक गोवरे, केतन दुधाणे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले की, पायाभूत सोयीसुविधा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. गेल्या अडीच वर्षांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. पुढील अडीच वर्षांत याच विकासकामांचा वेग दुप्पट राहील. यापुढे या परिसरातील कोणतीच समस्या शिल्लक राहाणार नाही. यासाठी येथील स्थानिक आमदार सक्षम आहेतच, शिवाय आपणही याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आमदार साळवी यांनीही, येथील आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आल्याची माहिती गेल्यावर्षीच मिळाली होती. त्यानुसार नव्या इमारतीसाठी निधी आणण्याचा आपला प्रयत्न सुरू झाला. याला यश येऊन अडीच कोटी रुपये मिळाले आहेत. आता हे केंद्र अद्ययावत आणि सुसज्ज होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जया माने यांनी, साखरपा विभागाची गरज म्हणून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी केली. या विभागातील ४० गावांना हे केंद्र वरदान ठरते. तसेच महामार्गावरील जखमींसाठीही हे केंद्र उपयुक्‍त असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com