उष्म्याचा आंब्याला फटका? 

उष्म्याचा आंब्याला फटका? 

सावंतवाडी - वाढत्या उष्णतेचा फटका आंबा बागायतीना बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात फळधारणा झालेला आंबा करपण्याचा व फळमाशी रोग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बागायतदारांत काहीसे चिंतेचे वातावरण आहे. त्यात आंब्याच्या कमी उत्पादनाचा परिणाम बाजारभावावर होत आहे. 

आंबा बागायतीचा फळधारणेचा 50 टक्के हंगाम जवळपास पूर्णत्वास आला असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात आंब्याचे 33 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यातील 22 हजार 300 हेक्‍टर क्षेत्रावर आंबा पीक घेतले जाते. जिल्ह्यात नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चांगल्या प्रकारचा मोहोर आंबा बागायतींना आला होता, याला कारण खरीप हंगामात पुरेशी प्रमाणात झालेली पर्जन्यवृष्टी व वातावरणात निर्माण झालेला गारवा हे होते त्यामुळे बागायतदारही आनंदात होते. पहिल्या टप्यात आलेले आंबा पीक बागायतदारांना उत्पादन मिळवून देण्यास साहाय्यभूत ठरले; मात्र अलीकडे वाढत असलेली उष्णता आंबा बागायतदारांसाठी चिंतेचे कारण बनत आहे. जानेवारी नंतरच्या काही काळात उष्णतेचा काहिसा चढता आलेख राहीला होता. त्यामुळे आंबा बागायतीला आलेली फळे करपण्याची भीती निर्माण झाली होती. जास्त उष्णता राहिल्यास आंबा पिकांवर जळलेल्या स्वरुपाचे चट्टे येऊ शकण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसेच नवीन फळधारणा झालेल्या आंबापिकांची छोटी फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. गळून पडलेल्या या फळात फळमाशी आसरा घेत आहे. त्यानंतर झाडे व कलमांवर लटकत असलेल्या आंब्यावरही फळमाशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हीच फळमाशी आंब्याचा देठ कमकुवत करुन पुन्हा फळगळतीस कारणीभूत ठरते. या सर्व प्रक्रियाचा एकंदरीत दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या आंबा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणारा आहे. 

आंब्याचे उत्पादन कमी 
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील 50 टक्के आंबापीक बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. स्थानिक विक्रेत्यांकडून अडीचशे ते तीनशे ते साडेतीनशे प्रती डझन अशा विक्री दरात हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. मोठ्या आकाराचा हापूस साडेचारशे ते पाचशे रुपये प्रतिडझन, तर मध्यम आकाराचा तीनशे-साडेतीनशे ते चारशेच्या प्रति डझन उपलब्ध झाला आहे. यात पायरी आंबा साडेतीन ते चारशेच्या रुपये प्रतिडझन त्यात रायवळ आंबा शंभर रुपये डझनने उपलब्ध झाला आहे. सर्वसाधारण ग्राहकाला स्थानिक विक्रेत्याकडून सध्याच्या हंगामात अडीचशे ते तीनशे प्रतिडझन बाजारभाव आहे. गतवर्षी या कालावधीत हा दर चारशे ते पाचशे रुपये डझन असा चांगला बाजारभाव होता. परंतु यंदा असलेल्या बाजारभावाचा दर लक्षात घेता आंब्याचे उत्पादन कमी असल्याचे लक्षात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com