नाईक यांचे बांधकाम अनधिकृत - समीर नलावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

कणकवली - पदाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकाम करणे आणि त्याची विक्री करणे, या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांना नगरपंचायतीने नोटीस बजावली आहे. तसेच नगरसेवकपदावरून त्यांना अपात्र करावे यासाठीचाही प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे, अशी माहिती काँग्रेसचे नगरसेवक समीर नलावडे यांनी आज दिली.

येथील काँग्रेस कार्यालयात श्री. नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी नगरसेवक अभिजित मुसळे, अण्णा कोदे, कंझ्युमर सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे उपस्थित होते. 

श्री. नलावडे म्हणाले, ‘‘शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्या समृद्धी कॉम्प्लेक्‍सच्या अनधिकृत बांधकामाबाबत आम्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी ३० सप्टेंबर २०१६ रोजी उपोषण केले होते. या आंदोलनाला न्याय मिळाला आहे. कणकवली मुख्याधिकाऱ्यांनी श्री. नाईक यांना अनधिकृत बांधकाम एका महिन्यात काढून टाकावे, अशी नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना पदावरून अपात्र करावे, असा प्रस्ताव देखील मुख्याधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

श्री. नाईक यांनी तळमजला अधिक दोन मजले उभारण्याची परवानगी घेतली होती. यात या इमारतीमधील रहिवाशांचे साहित्य ठेवण्यासाठी बेसमेंटमध्ये स्टोअररूम आणि पार्किंगसाठी खुले क्षेत्र ठेवण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात बेसमेंटमधील स्टोअर रूमची विक्री करण्यात आली. पार्किंग जागेतही गाळे बांधले. याबाबतची कोणतीही कल्पना नगरपंचायतीला दिली नाही. नाईक हे ३१ मार्च २०१३ रोजी झालेल्या निवडणुकीत निवडून आले. यानंतरही त्यांनी एका स्टोअर रूमची विक्री केली. 

यामुळे त्यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचे निष्पन्न होत आहे.
श्री. नाईक यांच्या बांधकामाविरोधात आपणासह प्रथमेश राजन तेली यांनीही मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना २० फेब्रुवारी रोजी समृद्धी कॉम्प्लेक्‍समधील अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. तसेच नगरसेवकपदाचा गैरवापर केल्या प्रकरणी नगरपंचायत अधिनियम ४४ ई नुसार त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. नियमानुसार मुख्याधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून ९० दिवसांत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील, अशी आमची खात्री आहे.’’

...तर मंत्रालयासमोर उपोषण
राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. यामुळे नाईक यांच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईचे प्रकरण दडपले जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास या प्रकरणी आम्ही मंत्रालयासमोर उपोषणास बसणार असल्याचेही श्री. नलावडे यांनी जाहीर केले.

Web Title: sushant naik illegal construction