‘शिक्षक निवडणूक’ शिवसेना गांभीर्याने लढतेय - विनायक राऊत

‘शिक्षक निवडणूक’ शिवसेना गांभीर्याने लढतेय - विनायक राऊत

सिंधुदुर्गनगरी - कोकण विभाग शिक्षक मतदार निवडणूक शिवसेना प्रथमच गांभीर्याने लढवित आहे. शिक्षक क्षेत्रात कार्यरत असलेले अभ्यासू उमेदवार ज्ञानेश्‍वर म्हात्रे हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण क्षेत्राला अडचणीत टाकणारे शासनाचे निर्णय व निकष बदलण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या पाठीशी येथील शिक्षक खंबीरपणे उभे असून शिवसेनेचे उमेदवार म्हात्रे निवडून येतील, असा दावा खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारीला होत आहे. यात प्रथमच शिवसेनेतर्फे श्री. म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज राऊत यांनी आपल्या ओरोस येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी आमदार वैभव नाईक, उमेदवार ज्ञानेश्‍वर म्हात्रे, बाबा आंगणे, जान्हवी सावंत, छोटू पारकर, संजय पडते, संजय भोगटे आदी उपस्थित होते.

श्री. राऊत म्हणाले, ‘‘कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शिवसेना या वेळी गांभीर्याने लढवित आहे. श्री. म्हात्रे यांचा शिक्षण क्षेत्राचा मोठा अभ्यास आहे. अनेक वर्षे ते या क्षेत्राशी निगडित असून सध्या ते बदलापूर येथील शिवभक्त विद्यामंदिर या प्रशालेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक सेना कोकण विभाग व कोकण विभाग शिक्षण संघर्ष समिती आदी संघटनांवर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अशा अभ्यासू उमेदवाराला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. शिक्षकांचे व शिक्षण संस्थांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी गेली अनेक वर्षे ते संघर्ष करीत आहेत. त्यामुळे येथील शिक्षक त्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील.’’

या वेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, ‘‘जिल्ह्यात बोगस पटनोंदणी नसतानाही सिंधुदुर्गावर शासनाच्या नव्या कायदा व निकषांचा अनुषंगाने अन्याय होत आहे. येथील लोकसंख्या रोडावली आहे. त्यामुळे शाळा वाचविणे हा मोठा प्रश्‍न आहे. येथील शिक्षण संस्था, शिक्षक यांना अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. ते सोडविण्यासाठी अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी शिवसेनेने अभ्यासू उमेदवार दिला आहे. येथील शिक्षक त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून भरघोस मतांनी निवडून देतील. शिवसेना कार्यकर्तेही त्यासाठी प्रयत्न करतील.’’

श्री. म्हात्रे म्हणाले, ‘‘शासनाच्या २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शिक्षकांचे विधान परिषदेत सात प्रतिनिधी असूनही शिक्षकांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामुळे शिक्षक आमदार कमी पडले की काय, असा प्रश्‍न प्रत्येक शिक्षकाला पडला आहे.

शिक्षकांच्या प्रश्‍नाबाबत न्याय न देता उलट त्यांच्यावर अटी लादल्या जात आहेत. विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. इंग्रजी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी मराठी, हिंदी, उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये शिकविण्यात येणारा इंग्रजी पुस्तकातील अभ्यासक्रम बदलून तो सोप्या व विद्यार्थ्यांना सहज लक्षात येईल असा बदल करण्याची गरज आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याची संकल्पनाच मुळात चुकीची आहे. ती बंद केली पाहिजे. शाळा वाचवा, शिक्षक वाचवा. आपल्या अस्तित्वासाठी लढूया, ही आपली लढाई आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.’’
 

शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य बिघडले
शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. त्याचे कायम पावित्र्य जपले पाहिजे. या क्षेत्राला निःस्वार्थी प्रामाणिक व अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे; मात्र शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील निवडणुकीत काँग्रेससह इतर पक्षाकडून शिक्षण क्षेत्राशी काडीचा संबंध नसलेल्या धनदांडग्या उमेदवारांना उभे करून शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो रोखण्यासठी व शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांच्यासारख्या अभ्यासू व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी कोकण मतदारसंघातील शिक्षक उभे राहतील. भरघोस मतांनी निवडून देतील. त्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रयत्न करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com