जिल्ह्याच्या तापमानात घट; पण उकाडा वाढला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

कणकवली - जिल्ह्यात उन्हाच्या झळा आता सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यानंतर काही अंशी पारा उतरला असला तरी आजचे तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोचले होते. परिणामी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या भांड्यांना मागणी वाढू लागली आहे. 

जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कमालीचे तापमान वाढले होते; मात्र गेल्या दोन दिवसांपासून काही अंशी तापमान घटले असले तरी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत तापमान मात्र सरासरीपेक्षा काही अंशांनी वाढू लागले आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता ३७ अंशांवर पारा पोचला होता. चैत्राच्या सुरवातीलाच तापमान वाढल्याने यंदा वैशाख वणव्यात उन्हाच्या कडक ज्वाळा सहन कराव्या लागतील, अशी स्थिती आहे. कणकवलीच्या मंगळवारच्या आठवडा बाजारात मातीची भांडी खरेदी करणारे ग्राहक वाढले होते. आधुनिक सोयी-सुविधा आणि रेफ्रिजरेटर घरात असला तरी मातीच्या भांड्यातील पाण्याची चव न्यारीच असते. आजही जुनीजाणती मंडळी मातीची भांडी उन्हाळ्यात तरी खरेदी करत आहेत. स्टेनलेस स्टील, प्लास्टिक आणि फायबरच्या जमान्यात मातीच्या भांड्यांना मागणी वाढू लागल्याने कुंभार व्यावसायिकांना दिलासा मिळू लागला आहे.

आजचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
 कणकवली, वैभववाडी : ३८ 
 कुडाळ : ३७
 सावंतवाडी, देवगड, दोडामार्ग : ३६
 वेंगुर्ला, मालवण : ३४

Web Title: temperature decrease in district