थर्टी फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट!

अलिबाग - वर्षअखेर साजरा करण्यासाठी आलेले पर्यटक. (छायाचित्र - समीर मालोदे)
अलिबाग - वर्षअखेर साजरा करण्यासाठी आलेले पर्यटक. (छायाचित्र - समीर मालोदे)

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भक्कम उपाययोजना 
अलिबाग - सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक ती उपाययोजना केली आहे. प्रमुख पर्यटनस्थळांवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्याबरोबरच किनाऱ्यावर तीन स्पीड बोटींतून दिवस-रात्र गस्त घातली जात आहे. ‘थर्टी फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट’ असे प्रशासनाचे धोरण आहे.   

मांडवा, किहिम, वरसोली, अलिबाग, नागाव, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धनचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. 

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये २५ हजारांहून जास्त पर्यटक दाखल झाले आहेत. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, अष्टविनायक देवस्थानांपैकी पाली व महड या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांनी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम जाहीर केले आहेत. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी कंबर कसली आहे.

थर्टी फर्स्टला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलसि विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रमुख पर्यटनस्थळांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत स्थानिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त २०० जादा पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

वाहतूक नियंत्रणासाठी नियमित पोलिस बंदोबस्तासोबत ८० जादा कर्मचारी तैनात ठेवले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी ब्रेथॲनालायझरची मदत घेतली जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. 

२४ तास गस्त
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर तीन स्पीड बोटींद्वारे २४ तास गस्त घातली जात आहे. याशिवाय नऊ पोलिस चेक पोस्टवरील बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. प्रत्येक चेक पोस्टवर साहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि तीन पोलिस कर्मचारी तैनात आहेत. येणाऱ्या गाड्यांची आणि वाहनचालकांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक कार्यालयाने जारी केले आहेत. अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com