तिकीट न देण्याचा गुन्हा चौथ्यांदा घडल्यास वाहक बडतर्फ

तिकीट न देण्याचा गुन्हा चौथ्यांदा घडल्यास वाहक बडतर्फ

कणकवली - प्रवाशाकडून भाडे वसूल करून तिकीट न देण्याचा गुन्हा चौथ्यांदा झाला तर तो वाहक एसटी महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ होणार आहे. याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाने नुकतेच जारी केले. 

वाहक अपहारप्रकरणी यापूर्वी महामंडळाने १ मार्च २०१६ रोजी परिपत्रक काढले होते. यात कुठल्याच गुन्ह्यात तडजोड न करता १० ते १५ हजार किंवा ५०० ते ७५० पट दंडाची तरतूद केली होती. हे परिपत्रक शासनाने रद्द केले असून, आता २७ जानेवारी रोजी नवे परिपत्रक लागू केले आहे.

एसटी महामंडळाच्या नव्या परिपत्रकानुसार वाहकांनी प्रवास भाडे वसूल करून तिकीट न दिल्यास त्यांच्या प्रथम प्रमादाला, अंतर्भूत रकमेच्या ३०० पट किंवा १० हजार रुपये यापेक्षा जास्त असेल ती रक्कम वसूल केली जाणार आहे. 

भाडे वसूल करून तिकीट न दिल्याचा प्रमाद दुसऱ्यांना घडला, तर अंतर्भूत रकमेच्या ४०० पट किंवा १५ हजार यापैकी जास्त असेल एवढी रक्कम वसूल केली जाणार आहे. हाच प्रमाद तिसऱ्यांदा झाला तर अंतर्भूत रकमेच्या ५०० पट किंवा २० हजार यापैकी जास्त असेल ती रक्कम वसूल केली जाणार आहे.

चौथ्या प्रमादावेळी मात्र संबंधित वाहकाला निलंबित करून शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई केली जाणार आहे. यात आरोप सिद्ध झाल्यास त्या वाहकाला बडतर्फ करण्यात येणार आहे. प्रवाशांकडून प्रवास भाडे वसूल न करणे आणि तिकीटदेखील न देणे यासाठीही कारवाईची तरतूद केली आहे. हा प्रमाद प्रथम घडल्यास अंतर्भूत रकमेच्या ५० पट किंवा १ हजार रुपये, दुसऱ्या प्रमादासाठी अंतर्भूत रकमेच्या १०० पट किंवा २ हजार रुपये तर तृतीय प्रमादासाठी अंतर्भूत रकमेच्या १५० पट किंवा ३ हजार रुपये यापैकी जास्त असेल ती रक्कम वसूल करण्यात येणार आहे, तर चौथ्या प्रमादासाठी वाहकाला निलंबित करून शिस्त व आवेदन कार्य पद्धतीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आरोप सिद्ध झाल्यास बडतर्फ करण्याची शिक्षा असणार आहे. अशा बाबतीत पहिल्या प्रमादासाठी अंतर्भूत रकमेच्या ७५ पट परंतु किमान १० हजार एवढी नुकसानभरपाई वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

दुसऱ्या प्रमादासाठी अंतर्भूत रकमेच्या १५० पट परंतु, किमान २० हजार इतकी रक्कम वसूल करण्यात यावी. तिसऱ्या व त्यानंतरच्या प्रमादासाठी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार आरोप पत्र देऊन कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तपासणी कर्मचाऱ्यावरही कारवाई
अपहारप्रकरणी तडजोड न करता शिस्त व आवेदन पद्धतीनुसार एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये विनातिकीट प्रवास किंवा तिकीट न देणे अशी वाहकाकडून झालेली अनियमितता, गैरवर्तणुकीचे कृत्य शोधण्यास व त्याची खबर देण्याचे तपासणी कर्मचाऱ्याने टाळाटाळ केल्यास, त्या तपासणीसावरदेखील कारवाई हाेणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com