अंध विद्यार्थ्यांच्या सांगीतिक मैफलीने रसिक मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

रत्नागिरी - वीरश्री ट्रस्टच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘तिमिरातून तेजाकडे’ या कार्यक्रमातून घराडी (ता. मंडणगड) येथील स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीकरांना अनोखी सांगीतिक मेजवानी दिली. विविध हिंदी, मराठी गीते, नाट्यगीते, देशभक्तिपर गीतांनी हा कार्यक्रम बहारदार झाला. स्वत:चे जग काळोखात असूनही या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना जगण्याची नवी प्रेरणा आपल्या कलेतून दिली.

सुरवातीला स्नेहज्योती विद्यालयाच्या उपक्रमांची चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर मुलांनी सुंदर सुंदर गीते लाइव्ह ऑर्केस्ट्रासोबत पेश करून उपस्थितांची दाद मिळवली. या मुलांना रत्नागिरीतील संदीप कर्लेकर, मंगेश मोरे यांनी सिंथेसायझरसाथ, समीर कांबळे यांनी गिटार, तर शार्दूल मोरे यांनी ऑक्‍टोपॅडची साथ केली. सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले. या वेळी वीरश्री ट्रस्टने गेले दोन वर्षे केलेल्या विविध उपक्रमांची माहिती चित्रफितीद्वारे दाखवण्यात आली. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ‘स्नेहज्योती’च्या कार्यक्रमाला दाद देतानाच मदतीसाठी आपला हात नेहमीच पुढे असेल, असे आश्वासन दिले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनीही स्नेहज्योती विद्यालय आणि वीरश्री ट्रस्टच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले.

वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी वीरश्री ट्रस्टच्या कामाचा आढावा घेतला. येत्या वर्षभरामध्ये मुलांना टीव्ही, मोबाइल आणि संगणकापासून दूर ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टच्या उपाध्यक्षा आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी आणि मुलांना होणाऱ्या विविध आजारांची कारणे 
विशद केली. 

यावेळी वीरश्री ट्रस्टने वंध्यत्व या विषयावर तयार केलेल्या रत्नागिरीतील पहिल्या वैद्यकीय कार्टून बुकचे अनावरण प्रणय अशोक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापक श्री. शर्मा, जाणीव संस्थेचे अध्यक्ष महेश गर्दे, बांधकाम व्यावसायिक संतोष तावडे, विजय पाटील, सचिन कांबळे, वीरश्री ट्रस्टच्या सचिव डॉ. निशिगंधा पोंक्षे, कोषाध्यक्ष कोमल तावडे, सदस्य सूरज शिंदे उपस्थित होते.

Web Title: timiratun tejakade event