कृषीमुळे पर्यटन झाले बारमाही

घुमडे - मसाला पिकाची माहिती देताना भाऊ सामंत.
घुमडे - मसाला पिकाची माहिती देताना भाऊ सामंत.

घुमडेतील यशोगाथा - सागरी पर्यटन विश्‍वात वेगळेपण

मालवण  - चहूबाजूने डोंगर आणि खोल दरीत वसलेला गाव म्हणजे घुमडे. मसाल्याच्या विविध पिकांसह आंबा, काजू, फणस, माडा, पोफळींच्या बागांनी बहरलेल्या या गावास निसर्गाचा वरदहस्त आहे. या गावात जिल्ह्यातील पहिला कृषी पर्यटनाचा प्रकल्प भाऊ सामंत यांनी साकारला. गेल्या बारा वर्षात येथे भेट देणाऱ्या राज्याच्या विविध भागातील पर्यटकांमुळे येथील कृषी पर्यटन बारमाही बहरलेले दिसून येते. सागरी पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनाचा वेगळा आनंद लुटण्यासाठी गेल्या काही वर्षात हजारो पर्यटक घुमडे गावाकडे वळू लागले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर येथे सुरवातीस केवळ सागरी पर्यटनाकडेच पर्यटक आकर्षित होत असल्याचे दिसून आले. याच दरम्यान २००५ मध्ये घुमडे येथील प्रगतशील शेतकरी श्री. सामंत हे कोकण भूमी प्रतिष्ठानच्या संपर्कात आले. या संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे, सचिव संजय यादवराव यांच्या मार्गदर्शनाखाली विश्‍वनाथ सावंत, प्रवीण मुळीक यासारखी मंडळी कोकणात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करत होते. टूर ऑपरेटर म्हणूनही ही मंडळी काम करत होती. त्यामुळे श्री. सामंत यांनी त्यांना घुमडे गाव दाखवीत येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारे असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोकण पर्यटन महासंघाची स्थापना झाल्यानंतर त्याची पहिली बैठक कोळथरे दापोली येथील माधव महाजन यांच्या कृषी पर्यटन केंद्रावर झाली. या केंद्राची पाहणी केल्यानंतर तसेच कृषी पर्यटनाचे जनक कॅप्टन शेखर भडसावळे, प्रभाकर सावे यांची श्री. सामंत यांनी भेट घेत कृषी पर्यटनासंबंधीची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर २००५ मध्ये विश्‍वनाथ सावंत यांनी पर्यटकांचा एक ग्रुप पर्यटनासाठी घुमडे गावात आणला आणि येथूनच घुमडे गावात कृषी पर्यटनाची सुरवात झाली. 

केरळला भेट देणारे पर्यटक हे तेथील मसाला पिकांची बाग पहायला जातात. त्यामुळे केरळच्या धर्तीवर घुमडे गाव स्पाइस व्हिलेज म्हणून विकसित करण्यात आले. त्यामुळे कृषी पर्यटनाचा वेगळा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात घुमडे गावात येऊ लागले. गृहिणी मसाला वापरतात मात्र दालचिनी व तमालपत्र हे एकाच झाडापासून मिळते याची माहिती त्यांना नसते ती या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना मिळाली. जायफळ, जायपत्री या पिकांच्या माहितीबरोबरच जायफळाच्या टरफलापासून लोणचेही बनविले जाते, मिरी लागवड कशी केली जाते. काजू, फणस, नीरफणस यासह अन्य मसाला पिकांच्या झाडांची माहिती त्याचबरोबर कोकम (रतांबा) आगळ, मुठयाला कसे बनविले जाते याची माहिती कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना मिळू लागली. कृषी पर्यटनाचा आनंद लुटण्यास येणाऱ्या पर्यटकांना बागेत जमिनीवर बसवून केळीच्या पानात जेवण वाढले जाते. यात केळीची भाजी, बोंडाची भाजी, नीरफणस, चुरण पाला भाजी, पातोळे, काकडीपासून विविध गोड पदार्थ, रस शेवया, रस घावणे, आंबोळी चटणी, वांगे भरीत, उकडीचे मोदक यासारख्या खाद्यपदार्थांचाही आस्वाद पर्यटकांना लुटण्यास मिळू लागला. त्यामुळे या कृषी पर्यटनाची जशी प्रसिद्धी होत गेली तसे येथील कृषी पर्यटनास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

सुरवातीस कृषी पर्यटनाचा आनंद लुटण्यास येणाऱ्या पर्यटकांची निवासाची व्यवस्था होत नव्हती. त्यामुळे भाऊ सामंत यांनी पर्यटकांसाठी होम स्टे साकारले त्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होत गेल्याने त्यांनी सामंत हेरिटेज नावाचे रिसॉर्ट साकारले आहे. घुमडे गावात जायफळ, लवंग, मिरी, दालचिनी, वेलची, कॉफी, ऑल स्पायसेस (मसाल्याचे सर्व गुणधर्म एका झाडात) लावण्यात आल्या आहेत. या झाडांच्या ठिकाणी त्या झाडाच्या उपयोगाची संपूर्ण माहिती लावण्यात आली आहे. याचबरोबर कृषी पर्यटनात जांभ, आंबा, काजू, फणस, कोकम यासह माडा, पोफळीच्या बागांनी बहरलेला परिसर पाहून पर्यटक प्रफुल्लीत होतात.

सागरी पर्यटनाकडे आकर्षित होणारे पर्यटकही गेल्या काही वर्षात या कृषी पर्यटनाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले असून येत्या काळात कृषी पर्यटनात मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढेल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत

रेन डान्स अन्‌ कृत्रिम धबधबा सुद्धा
कृषी पर्यटनाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भाऊ सामंत यांनी रेन डान्स आणि कृत्रिम धबधबा यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रेनडान्समध्ये झाडांवर पाइप स्प्रिंकलर बसवून कृत्रिम पाऊस पाडला जातो. यात उन्हाळ्यात पर्यटकांना पावसात भिजत डान्स करण्याचा आनंद लुटता येतो. शिवाय रेनडान्ससाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा उपयोग बागायतीसाठी केला जातो. त्यामुळे दुहेरी दृष्टिकोन ठेवून साकारण्यात आलेला उपक्रम पर्यटकांच्याही पसंतीस उतरला आहे.

घुमडे - येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com