व्यापाऱ्यांनी विकासाच्या नियोजनात सहभागी व्हावे - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

वैभववाडी - व्यापाऱ्यांनी आपला पारंपरिक व्यापार करावाच; परंतु व्यवसायातील नवीन संधीचा शोध घेऊन त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्‍यक आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापाराप्रमाणेच जिल्हा विकासाच्या नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

वैभववाडी - व्यापाऱ्यांनी आपला पारंपरिक व्यापार करावाच; परंतु व्यवसायातील नवीन संधीचा शोध घेऊन त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्‍यक आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापाराप्रमाणेच जिल्हा विकासाच्या नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

जिल्हा व्यापारी महासंघाचा एकता मेळावा येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर झाला. मेळाव्याचे उद्‌घाटन पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले. मेळाव्याला आमदार नीतेश राणे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर, जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू, सारस्वत बॅंकेचे संचालक सुनील सौदागर, अनिल सौदागर, नितीन वाळके, शुभांगी पवार, संजय चव्हाण, सचिन बोरसे, नीलेश धडाम, संजय भोगटे, मनोज सावंत, संजय सावंत, महेश नार्वेकर, संजय लोके, अरविंद गाड, तुकाराम घोणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात व्यापारी दिगंबर सावंत यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातील अन्य काही व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, ‘‘देशात ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ जिल्हा म्हणून ओळखला जातो, तशाच पद्धतीने सचोटीने व्यापार करणारा आणि कायदा व्यवस्था पाळणारा जिल्हा म्हणून जिल्ह्याला ओळखले जायला हवे. जिल्ह्यात विकास अधिक गतीने होत आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यात आणला जात आहे; परंतु या निधीचा योग्य उपयोग होतो की नाही यावर व्यापारी वर्गाने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. 

आपला नेहमीचा व्यवसाय करताना ग्रामीण पर्यटनात व्यापाऱ्यांनी गुतंवणूक करावी. जिथे संधी आहे, तिथे स्थानिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा स्थानिकांकरिता आणलेल्या योजनांचा लाभ कुणीतरी वेगळ्याच प्रांतातील व्यक्ती घेतील. जिल्हा विकासात व्यापाऱ्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जिल्हा विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना विविध कराविषयी काही समस्या असतील तर सोडविण्याच्या दृष्टीने मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन त्या सोडविल्या जातील.’’

आमदार राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात व्यवसाय, व्यापार वाढविण्याकरिता व्यापाऱ्यांना ताकद देणे गरजेचे आहे. त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधांसह सुरक्षा देणे आवश्‍यक आहे. व्यापाऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी. बाजारपेठेचा विकास झाल्यास व्यवसाय वाढेल. ८ नोव्हेंबरला सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अद्याप ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही; मात्र डिजिटलायझेशन केले जात आहे. व्यापारी एकता मेळाव्यात भविष्यातील व्यापार कसा असेल यावर विचारमंथन होऊन व्यापाऱ्यांमध्ये प्रबोधन व्हायला हवे.’’

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. भडकमकर म्हणाले, ‘‘येथील व्यापाऱ्यांनी आपली एकता कायम ठेवावी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे जिल्ह्यात सदस्य वाढवावेत जेणेकरून कोकणातून चेंबरला उपाध्यक्ष मिळू शकेल.’’ 

आजच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या मांडल्या. विविध जाचक करप्रणाली रद्द करण्याची मागणी या वेळी केली. भविष्यात व्यापाऱ्यांनी अधिक संघटित व्हावे लागेल, असे संकेत त्यांनी दिले. व्यापारी मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुका व्यापारी संघाने दत्त मंदिर ते अर्जुन रावराणे विद्यालय अशी शोभायात्रा काढली.

हापूस आंब्याचे रोपटे भेट
व्यापारी मेळाव्याला आलेल्या प्रमुख पाहुण्यांसह सत्कारमूर्तीना व्यापारी संघटनेच्या वतीने आगळी-वेगळी भेट देण्यात आली. प्रत्येक पाहुण्याला हापूस आंब्याचे रोपटे देऊन कोकणचे भूषण असलेल्या हापूसची महती वाढविण्यात आली.

सध्या ई-कॉमर्स हे व्यापाऱ्यांसमोरील मोठे आव्हान आहे. परंतु जितकी आव्हाने तितकी मोठी संधी हे व्यापाऱ्यांनी ओळखले पाहिजे आणि त्या दृष्टीने पावले टाकायला हवीत. ई-कॉमर्समुळे आपल्या दर्जेदार उत्पादनाला जागतिक बाजारपेठ मिळू शकते. त्यामुळे या स्पर्धेत व्यापाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने उतरले पाहिजे. संपूर्ण देशात अशा पद्धतीने एकता मेळावा घेणारा सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे. 
- शंतनू भडकमकर, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स