वाहतूक कोंडीवर शहरी बससेवा उपाय

चिपळूण - रस्त्याचे काम सुरू व वाहतूक कोंडी या नेहमीच्या समस्या आहेत.
चिपळूण - रस्त्याचे काम सुरू व वाहतूक कोंडी या नेहमीच्या समस्या आहेत.

चिपळूण शहर - अंमलबजावणीत अडथळा; प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच तयार; बससेवेला मुहूर्त नाहीच

चिपळूण - चिपळूण शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपायोजना म्हणून शहरी बससेवा सुरू करण्याची मागणी जनतेतून सुरू आहे. पालिकेच्या प्रशासन विभागाने पाच वर्षांपूर्वी हा पर्याय सभागृहाला सुचविला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शहरी बससेवा सुरू झालेली नाही. प्रथमच सत्तेवर आलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी शहरी बससेवेची संकल्पना सत्यात आणावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.

शहरातील रिक्षा व्यवसायिकांची पिळवणूक न परवडणारी झाली आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जुने रस्ते दुरुस्त होत असले, तरी रस्त्यांची रुंदी आणि लांबी वाढलेली नाही. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्यातच पोलिसांचा वेळ वाया जात आहे. या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शहरात बससेवा सुरू करण्याचा पर्याय प्रशासन विभागाने सुचविला. जागरूक मंच आणि ज्येष्ठ नागरिकांनीही पुढाकार घेतला.

तत्कालीन नगराध्यक्षा सौ. रिहाना बिजले, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी शहरी बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता; मात्र दोघांनाही पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे हा विषय बारगळला.

प्रशासनाने शहर बससेवेचा परिपूर्ण प्रस्ताव तयार केला. लोकसहभागातून किमान तीन मार्गावर मिडी बसेस सुरू करता येतील. बहादूरशेख नाका, गोवळकोट बंदर, फरशीतिठा, उक्ताड, कापसाळपर्यंत बससेवा दिल्यास त्यातून पालिकेला चांगले उत्पन्न मिळू शकेल. त्यासाठी लागणाऱ्या बसेस खासगी मालकीच्या असतील. निविदा प्रक्रिया राबवून बसेसची निवड करता येईल. त्यामुळे पालिकेला आर्थिक गुंतवणूक करावी लागणार नाही.

बसमालकांकडून ठराविक रॉयल्टी आकारून ही सेवा देता येईल. वाहनांचा रंग व तिकीट दर पालिकेने निश्‍चित करायचे आहे. तपासणी नाके व तपासणी अधिकारीही पालिकेचे असतील. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना सवलतीच्या दरात मासिक पास दिल्यानंतरही शहरी बससेवा योजनेतून पालिकेला चांगले उत्पन्न मिळेल.

नियोजित मार्ग 
बहादूरशेख नाक्‍याहून काविळतळीमार्गे गोवळकोट  (८ कि.मी)
बहादूरशेख नाक्‍याहून डीबीजे महाविद्यालयमार्गे बस स्थानक ते गोवळकोट धक्का (८कि.मी)
पाग ते फरशी तिठा (८ कि.मी) 

तिकीट दर ...
पहिल्या पाच किमीच्या प्रवासासाठी ६ रुपये आणि पुढील प्रत्येक किमीच्या प्रवासासाठी २.५० रुपये आकारण्यात यावेत. 

सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्या...
वाहतूक कोंडीला अरुंद रस्ते, अनधिकृत बांधकामे, हातगाडीचालक, खोकेधारक व छोटे स्टॉलधारक आणि बाजारपेठेतील काही व्यापारीही कारणीभूत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून नाराजी ओढून घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी शहरी बससेवेचा पर्याय निवडावा. विरोधी पक्षाने लोकहिताच्या कामासाठी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्यावा, अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे.
- विनय कटारिया, चिपळूण

शहरी बससेवेचा प्रस्ताव मागील सभागृहासमोर चर्चेसाठी आला होता. याविषयाचा पूर्ण अभ्यास करून शहरी बससेवा नागरिकांच्या हिताची असेल तर हा उपक्रम आम्ही नक्की राबवू. 
- सौ. सुरेखा खेराडे, नगराध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com