खेडमध्ये वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

खेड - जनतादेखील कायद्याच्या रक्षकांचे कसे रक्षण करते, याचे उदाहरण आज खेडमध्ये पाहायला मिळाले. मोटार रस्त्यात उभी केल्याने झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसाला मोटारीतील तिघांनी दमदाटी आणि धक्काबुक्की केली. "तुझा बिल्ला नंबर दे, तुझी वर्दीच उतरवून टाकतो', अशी धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण दाबण्याचे तिघांचे प्रयत्न नागरिकांनी उधळून लावून कारवाई करण्यास भाग पाडले. त्यानुसार तिघांना अटक झाली.

दुपारी एकच्या सुमारास खेड बस स्थानकाबाहेर प्रकार घडला. वाहतूक पोलिस अनंत पवार कर्तव्य बजावत होते. खेडहून मुंबईच्या दिशेने जाणारी मोटार (एमएच-02-सीआर-122) रस्त्यातच उभी करून चालक दुकानात गेला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पवार वाहतूक कोंडी झाल्याने घटनास्थळी आले. त्यांनी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. गाडीची कागदपत्रे व परवाना मागितला. चालक उस्मान खान याने पवार यांना शिव्या देण्यास सुरवात केली. हे ऐकून तेथूनच काही अंतरावर उभ्या असलेल्या संदीप कोलते यांनी चालकाला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोटारीतील आणखी दोघांनी पवार यांना शिवीगाळ केली. "तुला बघून घेऊ, तुझा बिल्ला नंबर दे, तुझी वर्दी उतरवतो, तुला माहिती नाही, माझी पोच कुठपर्यंत आहे', अशा भाषेत पवार यांना दटावले. त्यावर पवार यांनी तुमच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहे, त्यामुळे तुम्ही मला शिव्या देऊ नका, अशी विनंती केली, तरीही या तिघांनी न ऐकता त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे अनंत पवार त्यांना घेऊन मोटारीसह पोलिस ठाण्यात आले.

बस स्थानकाबाहेरच हा प्रकार झाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. त्यातील अनेकजण पोलिस ठाण्यात आले; परंतु तत्पूर्वीच तिघांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे नागरिक संतापले. शहरवासीयांनी तिघांवर कारवाई झालीच पाहिजे, असा रेटा लावला. त्यामुळे पोलिसांनी प्रशांत दगडू तांबे (30), हाजी पिन्नू हिंगोरा (46) व चालक उस्मान खान (24, तिघेही रा. बांद्रा) या तिघांना अटक केली. प्रेमळ चिखले, नागभूषण शेणॉय, गणेश शेणॉय, मंगेश गुडेकर, बॉबी खेडकर, राकेश पाटील, सुमित बुटाला, संदीप कोलते यांनी झालेला प्रकार पाहिला असल्याने या तिघांना घेऊन आपण पोलिस ठाण्यात आल्याचे पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध भादंवि 353, 332, 505, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.